भुसावळ। सद्यस्थितीत तरुणाईसमोर रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रत्येक जण सरकारी नोकरीच्या मागे धावपळ करीत असतो मात्र नोकरी न मिळल्यास तरुण पिढी हताश होऊन वेगळ्या मार्गाकडे वळते, शासनातर्फे स्वयंरोजगारासाठी विविध योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी मदत केली जाते. त्यामुळे तरुणांनी स्वयंरोजगाराची कास धरुन आपला विकास साधावा, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले.
अनुज ट्रेनिंग सेंटरचा प्रकल्प
शहरातील राममंदिर परिसरात अनुज ट्रेनिंग सेंटरतर्फे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
1 हजार 400 महिलांना दिले प्रशिक्षण
याप्रसंगी पुढे बोलताना आमदार सावकारे म्हणाले की, देशात परिवर्तन होत आहे. राज्य व केंद्र शासनातर्फे उद्योगाला प्राधान्य देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून तरुण पिढी आपला उद्योग, व्यवसाय उभारुन बेरोजगारीवर मात करु शकतात. यामुळे स्वत:चा तसेच इतर बेरोजगांरांनाही रोजगार उपलब्ध होऊन आपल्या परिसरातील गरजू तरुणांचाही विकास साधला जाऊ शकतो. या अगोदर विविध उपक्रमांच्या माध्यमातून 1 हजार 400 महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांनी उद्योग उभारले. त्यांच्या वस्तूंना मार्केट मिळावे त्यादृष्टीने दिवाळीत स्टॉल लावून रोजगार मिळवून दिला असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून सुशिक्षीत बेरोजगारांना प्रशिक्षण दिले जाऊन त्यांना उद्योग उभारणीसाठी मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, नगरसेविका शोभा नेमाडे, रजनी सावकारे, नारायण कोळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अनिता अंबेकर यांनी केले. यशस्वितेसाठी पौर्णिमा अट्रावलकर, राजेश काठोदे, प्रतिभा तावडे, अनिता देशपांडे यांनी परिश्रम घेतले.