तरुणांमध्ये सकारात्मक सक्षमता निर्माण करण्याची गरज – नवल किशोर राम

0

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

पुणे : तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवून त्यांच्यामध्ये सकारात्मक सक्षमता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. त्याचबरोबर येत्या 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्न होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले आदी उपस्थित होते.

समन्वयातून कार्यक्रम यशस्वी होईल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायग्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवनभर कार्य केले. त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. देशाला सर्वोत्तम राज्य घटना देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. त्यांच्या विचार आणि वाणीमध्ये खूप मोठी ताकत होती, असे नवल किशोर राम यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर विश्‍वास आणि श्रद्धा असणारे विजयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. येथील 1 जानेवारीचा कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जनता यांच्या एकत्रित समन्वयातून हा कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

कायदा व सुव्यवस्था राखा

अभिवादन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतील त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे आणि येणार्‍या नागरिकांना पार्कींग, पिण्याचे पाणी, शौचालयांची व्यवस्था आदी बाबी उपलब्ध होतील याची काळजी घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी राम म्हणाले. अन्न-पदार्थांच्या स्टॉलवर भेसळयुक्त पदार्थ नसतील, याबाबत दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून प्रतिबंधात्मक कार्यवाही चालू आहे. देशविघातक, समाजविघातक शक्ती कार्यरत असतात, जाती-जातींमध्ये भांडणे लागावीत हाच त्यांचा हेतू असतो, अशा शक्तींपासून आपण सावध राहायला हवे. प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहे. प्रत्येक नागरिक हा पोलीस असतो, असे नमूद करून नागरिकांनी त्यांना काही नकारात्मक बाबी आढळून आल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले.