सूत्रधारतर्फे ‘द आर्ट कनेक्ट’ टॉक शोचे आयोजन
पुणे । शास्त्रीय संगीत ऐकणार्या श्रोत्यांमध्ये संगीत समजणारे कमी लोक असतात. वेगवेगळ्या प्रकारचे संगीत लोकांना समजावे, शास्त्रीय संगीत ऐकणार्या लोकांची संख्या वाढावी या उद्देशाने शुद्धनाद संस्थेची सुरुवात केली. संस्थेमध्ये छोटेखानी मैफिलीची सुरुवात झाल्यानंतर रसिकांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचत आहे. याशिवाय युवा कलाकार आजच्या तरुणाईमध्ये संगीताविषयी प्रेम व आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगत शुद्धनाद संस्थेतील युवा कलाकारांनी रसिकांशी संवाद साधता आपला कलाप्रवास उलगडला.
सूत्रधारतर्फे भारतीय कथाकथनाच्या विविध शैलींची ओळख करून देण्यासाठी ‘द आर्ट कनेक्ट’ या टॉक शोचे आयोजन सेनापती बापट रोड येथील कलाछाया दालनात करण्यात आले. टॉक शो अंतर्गत संगीताच्या विविध प्रकारांचे छोटेखानी मैफलीच्या माध्यमातून सादरीकरण करणार्या शुद्धनाद संस्थेच्या अनुप कुलथे व कपिल जगताप यांची मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूत्रधारच्या आयोजिका मधुरा आफळे, तोषल गांधी, नताशा पूनावाला, वल्लरी आपटे यांनी सादर केलेल्या नृत्यावर कलर थेरपिस्ट नम्रता शर्मा यांनी लाइव्ह पेंटिंग केले.
कलेच्या माध्यमातून माणसे जोडवी
अनुप कुलथे म्हणाले, संगीताचे शिक्षण घेत असताना आमचे गुरू सांगायचे, आपल्या कलेच्या माध्यमातून माणसे जोडणे हे आपले पहिले आणि शेवटचे ध्येय असले पाहिजे. छोटेखानी मैफलीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत यामाध्यमातून अनेक लोक जोडले गेले. संगीताची अभिजातता कमी होऊ न देता ही कला तरुणाईपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे करीत आहे.
नवोदितांना व्यासपीठ
कपिल जगताप म्हणाले, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि त्या माध्यमातून आपली कला रसिकांसमोर सादर करता यावी, यासाठी संस्थेतर्फे छोटेखानी मैफिलींचे आयोजन केले जाते. शुद्धनादची सुरुवात केल्यानंतर जागेच्या अभावामुळे असो किंवा श्रोत्यांची कमी उपस्थिती अशा अनेक समस्या समोर येत होत्या. परंतु मनापासून एखाद्या गोष्टीची सुरुवात केली तर त्यामध्ये अडचणी येत नाहीत असा विश्वासदेखील होता.