पुणे । वडिलांबरोबर झालेल्या भांडणातून तरुणाने आत्महत्या करण्याची धमकी देत सरळ नदीत उडी मारल्याची घटना गुरुवारी सकाळी पुना हॉस्पिटल समोरील पुलावर घडली. वडिलांनी याची माहिती पेट्रोलिंग करत असणार्या पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने पाण्यात उडी मारून त्या मुलाला सुखरूप नदीतून बाहेर काढले. चेतन भीमराव सकट (रा. हडपसर) असे मुलाचे नाव आहे. चेतन आणि त्याचे वडील भीमराव (वय 43) हे दोघे पुना हॉस्पिटल समोरील पुलावर बोलत उभे होते. चेतन याने वडिलांना नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी देत सरळ पुलावरून खाली पाण्यात उडी मारली. वडिलांनी आरडाओरडा केल्याने तेथे असलेले विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी रवींद्र साबळे यांनी त्याच्या पोठोपाठ उडी मारली.
दरम्यान भिडे पुलाजवळ काही नागरिकांना तरुण वाहत जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनीदेखील नदीत उड्या मारल्या. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत रवींद्र साबळे यांच्या पायाला जखम झाली असून दोघांनाही ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.