तरुणाची पोलिसांसोबत धक्काबुक्की; गुन्हा दाखल

0

शिंदखेडा। येथील शिवाजी चौफुली येथे पोलीसांनी नाकेबंदी केली असून बाहेरून येणाऱ्या वाहनांची चौकशी होत आहे. शिरपूरकडून येणाऱ्या मोटारसायकल स्वाराला थांबवून विचारपूस करण्यात येऊन मास्क लावण्याचे सांगितल्याच्या कारणावरून तरुणाला याचा राग आल्याने पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुकी केल्या कारणावरून तरुणाविरुद्ध शिंदखेडा पो.स्टे.ला गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना या संसर्गजन्य रोगास प्रतिबंधक व्हावा, म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. शहरातील शिवाजी चौफुली येथे शिंदखेडा पोलीसांतर्फे नाकाबंदी केली असून वाहनाची चौकशी केली जात आहे. 31 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास शिरपूरकडून हर्षल देवीसिंग गिरासे (वय 26 रा.पथारे, ता.शिंदखेडा) हा विना नंबर प्लेट असलेल्या मोटारसायकलवरून मास्क न लावता फिरतांना आढळून आला. पो.कॉ. भामरे व लोखंडे यांनी विचारपूस करून तोंडाला मास्क लावण्याचे सांगितल्याच्या कारणावरून हर्षल गिरासे यास राग येऊन त्याने मोठ मोठयाने आरडा ओरड करून ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याने पो. कॉ. भामरे व लोखंडे हे जमिनीवरून पडल्याने जखमी झाले. याबाबत पीएसआय सुशांत वळवी यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदविला आहे. तपास पो.नि. दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुशांत वळवी करीत आहे.