तरुणाच्या धाडसामुळे वाचले तरुणीचे प्राण

0

पुणे । एस. एम. जोशी पुलावरून एका विद्यार्थीनीने मुठा नदीत उडी मारल्याचे पाहताच एका तरुणाने क्षणाचाही विलंब न करता तिच्या पाठोपाठ लगेच उडी मारून तरुणीला वाचवले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. समीर शेख (वय 18) असे या धाडसी तरुणाचे नाव आहे.

सदर तरुणी मूळची पनवेलची असून पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. इकडे ती पेइंगेस्ट म्हणून राहते. डेक्कन परिसरातील महाविद्यालयात तिसर्‍या वर्षाला शिकते. तरुणीच्या मैत्रिणी अभ्यासात हुशार असून त्यांच्या एवढा अभ्यास होत नसल्यामुळे तिला नैराश्य आले होते. त्यातून ती सोमवारी सायंकाळी 5.30 सुमारास एस. एम. जोशी पुलावर आली. तिने पुलावरून नदीमध्ये उडी घेतली. त्यावेळी समीर दुचाकीवरून पुलावरून जात होता. त्याने हा प्रकार पाहिला आणि त्याने ही तत्काळ तिच्या मागे पुलावरून नदीत उडी घेऊन तिला वाचविले. मुलीने नदीत उडी मारल्याचे पाहिल्यानंतर पुलावर मोठी गर्दी झाली होती. तसेच, अनेकांनी नदीपात्रात जाऊन दोघांना बाहेर काढले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.