देहुरोडः- एका महाविद्यालयीन तरुणाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धमकी देत लुटले असल्याचा प्रकार रावेत येथे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. याबाबत कुणाल लक्ष्मण मलवाडे (वय 19) या विद्यार्थ्याने अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल मलवाडे रावेत येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कुणाल जेवण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या बाहेर रस्त्यावर शतपावली करीत होता. अचानक दुचाकीवरून (एम एच 14, डीपी 7459) आलेल्या तिघांनी त्याला धमकी देत तुझ्याकडे असलेला मोबाईल व पैशांचे पाकीट देण्याची मागणी केली. कुणाल ने याला विरोध करताच तिघांनी त्याला मारहाण केली व जबरदस्तीने त्याच्याकडील मोबाईल व पैशांचे पाकीट असा एकूण आठ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.