तरुणावर प्राणघातक हल्ला करणार्‍या चौघा संशयितांना अटक

0

जळगाव : मजुरीच्या पैश्यांवरून अकरम ईस्माईल खाटीक (23) रा. मास्टर कॉलनी या तरूणावर 27 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता बोलवून आठ ते दहा जणांनी चॉपर तसेच लाकडी काठयांनी बेदम मारहाण करीत प्राणघातक हल्ला केला होता. या गुन्हयात एमआयडीसी पोलिसांनी फरार असलेल्या चार जणांना शुक्रवारी अटक केली. गुन्हा घडल्यापासून संशयित चौघेही सुरत येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे.

सुरतहून जळगावात येताच ताब्यात

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रारीवरून प्राणघातक हल्लयाचे कलम तसेच आर्म क्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीत तांबापुरा सुप्रीम कॉलनीत वेगवेगळया ठिकाणी राहत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप हजारे, सफौ अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सय्यद, राजेंद्र कांडेलकर, नितीन पाटील, आसीम तडवी, सचिन पाटील यांच्या पथकाने शेख जुनेद शेख युनूस (21), मोहमंद शोएब उर्फ रफत शेख सलीम (19), रिजायानखान अहमदखान (20), जाफरखान इकबालखान (23) सर्व रा. तांबापुरा बिस्मील्ला चौक यांना ताब्यात घेतले. या गुन्हयात पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले होते. गुन्हा घडल्यापासून हे चौघे तरूण फरार झाले होते. काही दिवस ते सुरत येथे वास्तव्यास होते. शुक्रवारी चौघेही जळगाव येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.