तरुण असूनही म्हातार्‍यांच्या भूमिका कराव्या लागल्या…

0

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सत्कार

पुणे : ‘मी जब्बारची नावडती राणी होतो. विद्याधर वाटवे आणि नंतर मोहन गोखले हे त्याचे आवडते नट! त्यामुळे चांगल्या भूमिकांना मी कायम मुकायचो. तरुण असूनही म्हातार्‍यांच्या भूमिका कराव्या लागल्या त्या जब्बारमुळेच! आता तर एरव्ही लेखन करणारा सतीश आळेकरही चित्रपटांमधून उत्तम भूमिका करून माझ्या पोटावर पाय देऊ लागला आहे. ‘व्हेंटिलेटर’ हा चित्रपट मी नाकारल्यामुळे त्याला मिळाला, असे तो सांगत फिरतो. पण खरेतर मीच त्याचे नाव सुचवले होते, हे मात्र सांगत नाही. या सगळ्या एकापाठोपाठ एक येणार्‍या कोपरखळ्यांनी एकच हशा पिकत होता. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी, असे अनेक किस्से रंगवत त्यांच्या जुन्या मित्रांवर मनमुराद कोट्या केल्या. जब्बार पटेल यांनीही त्यांना मिळालेली संधी न दवडता मोहन आगाशे यांचे तरुणपणातील अनेक रंजक किस्से सांगून उपस्थितांना खळखळून हसवले. या दोन समकालीन ज्येष्ठ कलाकारांच्या या विनोदी किस्स्यांनी एकप्रकारे मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीच्या असंख्य आठवणींना उजाळा मिळाला.

दोन कलाकारांची रंगली जुगलबंदी

निमित्त होते; महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद, पुणे शाखा आणि चित्रपट महामंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात विष्णूदास भावे पारितोषिक जाहीर झाल्याच्या निमित्ताने डॉ. आगाशे यांचा डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्या वेळी या दोन कलाकारांची रंगलेली जुगलबंदी रसिकांना अनेक रंजक किस्स्यांची शिदोरी देऊन गेली. प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, मेघराज राजेभोसले, दीपक रेगे, सुनीताराजे पवार, जयमाला इनामदार उपस्थित होते.

जयमालाच्या नावाने डिशेस

घाशीराम कोतवाल या नाटकाचे परदेशात प्रयोग व्हायचे तेव्हा त्या टीममध्ये लावणी सादर करण्यासाठी जयमाला इनामदार होती. तिने लंडनमध्ये एका प्रयोगात लावणी सादर केली आणि गोर्‍या नागरिकांना वेडे केले. त्या प्रयोगानंतर नाट्यगृहांच्या बाहेर तिच्या नावाने डिशेस विकल्या जाऊ लागल्या होत्या. ब्रिटीश लोकांसाठीही ती विशेष आकर्षण ठरली. डॉ. जब्बार पटेल यांनी हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जयमाला इनामदार यांनाही हासू आवरले नाही. घाशीराम कोतवाल या नाटकाच्या अशा असंख्य आठवणींना पटेल यांनी या वेळी उजाळा दिला.

नाटक ही सामूहिक कला

माझ्या बरोबर काम करणार्‍या मित्रांमुळेच मी आज कलाकार म्हणून परिचित आहे. नाटक ही सामूहिक कला आहे. त्यामध्ये कलाकाराचे यश किंवा अपयश हे वैयक्तिक नसते. जब्बार पटेल, सतीश आळेकर या मित्रांचाही त्यात मोठा वाटा आहे, असे डॉ. आगाशे यांनी सांगितले.