जळगाव । तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21 वर्ष) मतदार नोंदणी करण्यासाठी 1 ते 31 जुलै दरम्यान जिल्ह्यात मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या कालावधीत 8 व 22 जुलै 2017 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात, पोस्टाद्वारे नमुना-6 पाठविणे, एनव्हीएसपी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आणि नागरी सेवा केंद्रात नमुना-6 स्वीकारले जाणार आहे
ऑनलाईन अर्ज भरता येणार
या कालावधीत बीएलओ त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरोघरी जाऊन नमुना-6 गोळा करुन 18 ते 19 वयोगटातील (21 वर्ष वयापर्यंत) व्यक्तींकडून नमुना-6 भरुन घेणार आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर मोबाईल पर उपलब्ध करुन दिले असून त्याद्वारेही अर्ज भरता येणार आहे. तसेच या मोबाईल पद्वारे अर्जदारांनी भरलेल्या अर्जाची सद्यस्थिती कळणार आहे.
शैक्षणिक वसतीगृहांमध्ये शिबिरांद्वारे नोंदणी करण्यात येणार
या विशेष मोहिम अंतर्गत 18 ते 21 वयोगटातील अपंग मतदारांची तसेच अनिवासी भारतीयांची सुद्धा नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. तरुण मतदारांसाठी शैक्षणिक वसतीगृहांमध्ये विशेष शिबिरांद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना किंवा ज्येष्ठ प्राध्यापकांना मतदार नोंदणीसाठी नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले असून त्यांच्या माध्यमांतून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच मतदारांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.