तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0

जळगाव। खत-बियाण्यांच्या मार्केटींगसाठी जळगावात आलेल्या तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी सकाळी मृत्यू झाला. ही घटना शहरातील गुरूकृपा हॉटेल येथे घडली असून विलास नारायणसिंग परदेशी (वय-39 रा. नगरदेवळा ता. पाचोरा) असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास परदेशी हे नगरदेवळा येथे पत्नी व दोन मुलांसोबत राहत होता. तर खत-बियाण्यांचे मार्केटींगचे काम करायचे. 16 मार्च रोजी विलास हे जळगावात मार्केटिंगच्या कामानिमित्त आले होते. शहरातील व.वा.वाचनालय परिसरातील गुरूकृपा हॉटेल येथे थांबले होते.

आज बुधवारी मात्र, अचानक त्यांना सकाळी हृदयविकाराच्या झटका येवून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी बाथरूमजवळ आल्यानंतर त्यांना विलास परदेशी हे तिथे पडलेले दिसून आले. त्यांनी लागलीच हॉटेलमालकांना घटनेची माहिती दिली. त्यांनी लागलीच पोलिसांशी संपर्क साधून एकाचा हॉटेलात मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर विलास परदेशी यांना 108 मधून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारावर हॉटेल मालकाने विलास परदेशी यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. यानंतर दुपारी परदेशी यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गाठले होते. विलास परदेशी यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.