तर्‍हाड कसबे येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घरातच ‘शुभमंगल’

0

लॉकडाऊनचे नियम पाळत साध्या पद्धतीने विवाह
शिरपूर:कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यापासून तर पंतप्रधान मुख्यमंत्री सैनिक म्हणून लढा देत आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून शिरपूर तालुक्यातील तर्‍हाड कसबे येथे वधू-वरांनी आईवडिल आणि भटजींच्या उपस्थित अत्यंत साध्या पद्धतीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह करत साताजन्माच्या गाठी बांधल्या. विशेष म्हणजे लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करत सोशल डिस्टन्स राखले आणि वधुवरासह भटजीनेही तोंडाला मास्क लावत मंगलाष्टके म्हटली.

मानपान, वाजंत्री, महागडे कपडे दागिने अशी सर्व हौस भागविता यावी, म्हणून लॉकडाउनमुळे बहुतेक विवाह सोहळे रद्द झाले आहेत. मात्र, या सर्व रुढी परंपरेला फाटा देत आणि पैशांची होणारी उधळण टाळत 26 रोजी तर्‍हाड कसबे येथील हरिष कुमार आणि पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील वधू नंदिनी यांचा तर्‍हाड कसबे येथे लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह पार पडला. 26 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता आई-वडील आणि भटजीच्या मंत्रोपचाराच्या साक्षीने हरीश कुमार आणि नंदिनी यांचा विवाह पार पडला. लॉकडाऊनमुळे त्यांनी कोणत्याही प्रकारे नातेवाईक अथवा वर्‍हाडी मंडळींची गर्दी जमविली नव्हती. वधू-वरांच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अत्यंत साध्या पद्धतीने तोंडावर मास्क लावत हा विवाह पार पडला.

तहसीलदारांसह पोलीस निरीक्षकांची परवानगी
पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील श्रीराम भिमराव पाटील यांच्या कन्येचा विवाह शिरपूर तालुक्यातील तर्‍हाड कसबे येथील डॉ.ज्ञानेश्वर झगा पाटील यांच्या मुलाशी साध्या पद्धतीने घरातल्या घरात लग्न लावण्यात आले. हा विवाह अगोदर 16 एप्रिल रोजी ठरविण्यात आला होता. परंतु देशासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असतांना विवाह पुढे ढकलण्यात आला होता. या विवाहासाठी वधू-वराच्या कुटुंबियांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याची हमी दिल्यावर तहसीलदार आबा महाजन व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी परवानगी दिली होती.