तर कामगार कपातीसारखीच ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल – संजय राऊत

0

मुंबई – महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
सामनाच्या रोखठोक या सदरात राऊत म्हणतात, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही असे मी एका वरिष्ठ अधिकार्‍यास सांगितले. तेव्हा त्या अधिकार्‍याने एक मिश्किल भाष्य केले. मंत्रालयातही अनेकांच्या हाताला काम नाही तिथे इतरांचे काय घेऊन बसलात? करोनामुळे आय.ए.एस. आयपीएस अधिकार्‍यांचा एक मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत उभा आहे. त्यांना काम हवे आहे व तो त्यांचा हक्क आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही हे समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्रातले ‘ठाकरे सरकार’ कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरल्याची घंटागाडी वाजवत महाराष्ट्राचा विरोधी पक्ष पुनः पुन्हा राजभवनाची पायरी चढतो आहे, आंदोलने करतो आहे. अपयशाचे म्हणायचे तर मग कोरोनाच्या बाबतीत सगळ्यात अपयशी राज्य म्हणून उत्तर प्रदेश आणि गुजरातकडे पाहावे लागेल. महाराष्ट्रातून शरद पवार यांनी एक पत्र पंतप्रधान मोदी यांना पाठवले आहे. त्यात शेतकर्‍यांना मदत करण्याविषयी सुचवले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यावर भडकले. पवारांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावे असा त्रागा त्यांनी केला. पवारांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले हा त्यांचा अनुभव. मग विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांना आपल्याच पंतप्रधानांना पत्र लिहिण्यापासून कोणी रोखले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.