पुणे । अनुदानित खतांची विक्री पीओएस मशीनद्वारे करण्याचे आदेश शासनाने परवानाधारक खतविक्रेत्यांना दिले आहेत. जर पीओएस मशीनशिवाय खतांची विक्री केली तर संबंधीत खतविक्रेत्यांचा विक्री परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी सांगीतले. जिल्ह्यातील 153 मान्यताप्राप्त परवानाधारक खत विक्रेत्यांना 1 नोव्हेंबरपासून पीओएस मशीनचे वितरण करण्यात आले आहे. त्याद्वारे शेतकर्यांना अनुदानीत खताची विक्री, खत विक्री करण्यात येत आहे. त्यासाठी खत खरेदीसाठी शेतकर्यांना आधार कार्ड आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना खतांची खरेदी करताना अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा कृषी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच रासायनिक खत विक्रीचा लाभ थेट हस्तांतरण योजनेंतर्गत अनुदानित खतांची विक्री करण्यासाठी परवानाधारक खत विक्रेत्यांना पीओएस मशीन वापरणे बंधनकारक आहे. जिल्हाभरात परवानाधारक खतविक्री दुकानदारांकडून पीओएस मशीन वापरण्याची सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ज्या खतविक्रेत्यांकडे पॉस मशीन नाही त्यांना खतविक्री करता येणार नाही, असा आदेश कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
पीओएस मशीनमध्ये खत विक्रीसाठी उलपब्ध साठा भरण्यात आला आहे. त्यानुसार खतांची विक्री केली जाणार असून, संबंधित दुकानदाराला अनुदान मिळणार आहे. त्यामुळे अनुदानित खत हे फक्त मशीन धारकांनाच पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पीओएस मशीनची जोडणी शासनाच्या एनआयसी संस्थेला जोडण्यात आली आहे. एका क्लिकद्वारे संपूर्ण माहिती संगणकावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या वतीने खत विक्री नियंत्रीत केली आहे. कंपनींना विक्रीआधारे अनुदान मिळणार आहे. पॉस मशीन संदर्भात येणार्या अडचणी सोडविण्यासाठी मशीन पुरवठादार कंपन्यांना जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी सूचना करण्यात आली आहे.
117 विक्रेत्यांना मशीन देण्याची मागणी
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 153 मान्यताप्राप्त परवानाधारक खत विक्रेत्यांना पीओएस मशीनचे वितरण करण्यात आले असून, आणखी 117 विक्रेत्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. याबाबतची मागणी करण्यात आली आहे. विक्रेत्यांनी त्याद्वारे खतांची विक्री करावी अन्यथा परवाना रद्द केला जाईल.
– सुनील खैरनार
जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद