हडपसर । वीस दिवसांत जुना कालवा गटार मुक्त करा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, अन्यथा अधिकार्यांना त्याच गटारातील पाण्याने अंघोळ घालू, म्हणजे तीव्रता समजेल असा इशारा मोर्चातील नागरिकांनी प्रशासनाला दिला. हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अभियंता दिलीप पावरा यांनी याबाबतचे लेखी निवेदन स्वीकारले.
ससाणे म्हणाले, जुना कालवा बंद आहे. त्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. कचरा मोठ्या प्रमाणात साठला आहे. साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. तसेच कालव्या कडेच्या नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. हडपसर परिसरात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. कालव्याकडेच्या नागरिकांना डासांमुळे डेंग्यूच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. वीस दिवसांत जुना कालवा गटार मुक्त केला नाही तर अधिकार्यांना त्यातच गटारात अंघोळ घालण्याचा इशारा दिला. मोर्चात सागरराजे भोसले, अशोक धोत्रे, प्रकाश पवार, राम धोत्रे, नितीन ससाणे, अनिता धोत्रे, सागर झेंडे, शंकुतला पवार, महेश मेमाणे, शेरू कुरेशी, युवराज माळी, विजय भिंगारे, शुभम देवकर, नितीन ससाणे यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.