…तर चोरांना पकडणार कोण?

0

धुळे । पंचायतराज समिती धुळे जिल्हा दौर्यावर आलेली असताना चाडेचार कोटी रुपंयाची खंडणी गोळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेत घडला होता.त्याबाबत आ. अनिल गोटे यांनी भांडाफोड केला. त्यांनी हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांकडे नेले आहे. पोलिसांनी चोरांशीच युती केल्याने नेमके चोरांना पकडणार कोण? असा गंभीर सवाल आ.गोटेंनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचार प्रकरणात अनेक बडे धेंडे गुंतले असल्याने आ. गोटे आता स्वत: आखाड्यात उतरले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराचे खोदकाम सुरु केले आहे.वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली आयपीएस अधिकार्यांची नियुक्ती करुन त्यांच्या गटाकडून जिल्हा परिषदेतील गेल्या तीन वर्षांतील लेखापरिक्षण म्हणजे ऑडिट केले जावे.

जिल्हा परिषदेने केलेल्या विकासकामांची करावी चौकशी
गेल्या 10 वर्षांत जिल्हा परिषदेने केलेल्या विकासकामांची चौकशी करण्यात यावी,साडेचार कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या अधिकार्यांकडून एका स्वतंत्र गटाची स्थापना करुन तीन महिन्यांत पूर्ण करावी, दोषी व्यक्तींविरुद्ध खटले दाखल करुन जलदगती न्यायालयात हे खटले चालवावेत, भ्रष्टांना तुरुंगात खडी फोडायला पाठवावे, अशी मागणी आ. गोटेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करण्यासंबंधी आदेश व्हावेत
ग्रामपंचायत थाळनेर (ता.शिरपूर जि.धुळे) च्या सरपंच अरुणाबाई एकनाथ जमादार यांनी आपलेच ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार आदींविरुद्ध तक्रार केली आहे. शेतकर्यांना अनुदानापोटी द्यावयाच्या एकूण 362 प्लॅस्टीक ताडपत्र्या प्रतिनग 2,376 प्रमाणे खरेदी करण्यात आल्या. मात्र, सदर ताडपत्र्यांच्या दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे शेतकर्यांनी ताडपत्र्यांच्या वाटपांकडून पाठ फिरवली. सोलर कंदील एकूण 97 नग प्रत्येकी 3,200 प्रमाणे खरेदी केली आहेत. त्यापैकी एकही सौरऊर्जा कंदील वापरत नाही. केवळ सात-आठ महिन्यांच्या कालावधीत हे सर्व कंदील निरुपयोगी ठरले आहेत. तीच अवस्था सौर पथदिव्यांची आहे. या चारही प्रकरणाचीं गांभीर्याने दखल घेवून धुळे जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना मुंबई येथे साक्षीस येत असताना या सर्व प्रकरणांची शहानिशा करुन वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करण्यासंबंधी आवश्यक आदेश पारीत करावेत, असेही आ. गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

आ.गोटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्हा परिषदेच्या 2008-2009 तसेच 2011-2012 या आर्थिक वर्षांतच शासकीय लेखापालाने घेतलेल्या हरकतींबद्दलची वस्तुस्थिती जाणून घेण्याकरिता प्रकाश भारसाकडे यांच्या अध्यक्षतेखालील पंचायरातराज कमिटीने धुळे जिल्हा परिषदेस 5, 6 व 7 जुलै रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली असता फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अनियमितता तसेच गैरप्रकार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

सक्तीची वर्गणी म्हणजेच खंडणी गोळा
आपल्या पापाचा घडा भरेल, याची पूर्ण कल्पना जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांना व पदाधिकार्‍यांना होतीच. या कारणास्तव पदाधिकारी व अधिकार्‍यांनी संगनमताने संघटितरित्या एकत्र येऊन कट-कारस्थान आखून जि.प.कर्मचार्‍यांकडून फार सक्तीची वर्गणी म्हणजेच खंडणी गोळा केल्याची वस्तुस्थिती आपण स्वत:च बैठकीच्या पहिल्या दिवशीच सर्वांसमक्ष मांडली होती. परंतु ही बाब गांभीर्याने न घेता जणू काही हा कामकाजाचा एक भागच आहे, असे गृहीत धरुन अथवा नेहमीच्याच पद्धतीने दुर्लक्ष केले. मेहेरगाव येथील योगेश गवळे व अन्य गावातून ग्रामपंचायतीद्वारा निकृष्ठ दर्जाच्या कामांबद्दलची तक्रार गंभीर स्वरुपाची आहे.