मुंबई: संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा भारतात तीन महिन्यापासून अधिक काळ उलटला आहे. तीन महिन्यापासून लॉकडाऊन आहे, अजून किती दिवस कोरोना राहणार याबाबत काहीही निश्चितता नाही. मात्र प्रत्येकाने केंद्र, राज्य सरकारच्या सूचनांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर कमी करता येईल. जुलै-ऑगस्ट महिन्याचा काळ फार खडतड असल्याचा सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर फंडामार्फत केल्या जाणाऱ्या मदत कार्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व प्रयत्न करत आहेत, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने मोठी चिंता वाढली आहे. याकाळात नागरिकांनी शासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. राज्याचा अर्थचक्र पुन्हा गतिमान करण्यासाठी शासनाने उद्योग व्यवसायांना परवानगी दिलेली आहे. लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता आणलेली आहे, मात्र नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.