…तर फडणवीसांनी महाराष्ट्रात राहू नये: परिवहन मंत्री अनिल परब

0

मुंबई: माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात उडी घेतली आहे. काल अमृता फडणवीस यांनी “मुंबईने मानवता हरपत चालली असून आता मुंबईत राहणे असुरक्षित वाटू लागल्याचे” ट्वीट केले होते. यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेने अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांचा अपमान केला असल्याचे आरोप शिवसेनेने केले आहे. आठ महिन्यापूर्वी फडणवीस यांचे सरकार होते, त्यांच्या काळातीलच पोलीस यंत्रणा आता देखील कार्यरत आहे. त्यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांचे संरक्षण का घेतले? असा पलटवार शिवसेनेने केला आहे. दरम्यान आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहे.

फडणवीस यांना जर महाराष्ट्रात आणि मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई सोडावे असे आव्हान दिले आहे. पाच वर्षापूर्वी भाजपचे सरकार होते, त्यावेळी जी पोलीस यंत्रणा होती, तीच आता आहे असे अनिल परब यांनी सांगितले.

युवा नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. केवळ सोशल मीडियावर विनाधार संदेश व्हायरल केले जात आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी समोर यावे आणि माध्यमांना पुरावे द्यावे असे आव्हान देत केवळ राजकीय हेतूने युवा नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप मंत्री परब यांनी केले.