… तर बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार

0

पुणे । राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाने दिलेले आश्‍वासन न पाळल्याचा आरोप करत पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार्‍या इयत्ता बारावीच्या तोंडी व लेखी परीक्षांवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला आहे. पुणे विभागातील जवळपास दोनशे शिक्षकांनी गुरुवारी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता.

एक नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू करणे, 2012-13पासूनच्या शिक्षकांना नियुक्तीपासून मान्यता व वेतन देणे, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान सुरू करणे, वाढीव पदांवरील शिक्षकांना मान्यता देणे, 23 ऑक्टोबरचा वरिष्ठ वेतनश्रेणीचा निर्णय बेकायदेशी ठरविणे, शालार्थ प्रणालीत नव्या शिक्षकांचे नाव समाविष्ट करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी दुपारी शनिवार वाड्यापासून या शिक्षकांनी मोर्चाला सुरुवात केली. सेंट्रल बिल्डिंग येथील आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली. यानंतर मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्तांना दिले.

6 सप्टेंबरच्या बैठकीत दिवळीपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दोनदा निवेदन देऊनही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रा. एस. टी. पवार यांनी सांगितले. सकारात्मक निर्णय झाला नाही तर, 2 फेब्रुवारीपासून पुणे, नगर व सोलापूर येथील शिक्षक महाविद्यालये बंद ठेवतील तसेच बारावीच्या तोंडी व लेखी परीक्षेवरही बहिष्कार टाकतील. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष फाजगे, सुधाकर पडवळ, एस. ए. फुंदे, शरद सोमवंशी, लक्ष्मण रोडे आदी उपस्थित होते.