… तर बेस्ट संपकर्‍यांना मेस्मा लावणार!

0

प्रशासनाने दिला कर्मचार्‍यांना थेट इशारा

मुंबई : बेस्ट कर्मचार्‍यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. वेतनवाढ आणि वेतन निश्‍चितीबद्दलच्या रखडलेल्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने बेस्ट कर्मचारी आता अखेर संपाचे हत्यार उपसणार आहेत. बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत कामगार संघटनेची बैठक पार पडली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली असल्याने 30 हजार बेस्ट कर्मचार्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात मेस्मांतर्गत कायदा लागू करून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे. तसेच आगारप्रमुखांना सुट्ट्या देऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी हे आता आमने-सामने येणार आहेत.

दरम्यान, महाव्यवस्थापकांसोबतच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने बेस्ट कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यानंतर संप करण्याबद्दल कर्मचार्‍यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. यात संपाच्या बाजूने भरघोस मतदान झाले होते. बेस्टचे सुमारे 30 हजार कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. याचा मोठा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.