मुंबई । शिवसेनेला भाजपसोबत युतीच करायची नसेल तर आमच्याकडूनही हा विषय संपला, अशी संतप्त प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मतविभाजन टाळण्यासाठी आम्ही युतीबाबत आग्रही आहे पण उद्धव ठाकरेंनी युती न करण्याचा निर्णय घेतला असेल तर भाजपकडूनही युतीचा प्रस्ताव संपला असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजप आणि शिवसेना पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यावरूनही आमने-सामने आले आहेत. ‘भाजपशी युती नाही म्हणजे नाहीच’ अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मराठवाड्याच्या दौर्यात औरंगाबाद येथे केली होती. त्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली.
मुनगंटीवार म्हणाले, विरोधक एकत्र येत असताना भाजप-शिवसेनेने एकत्र येत युती व मतविभाजन टाळून ताकदीने निवडणूका लढाव्यात असे आमचे म्हणणे आहे, होते पण आता शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. शिवसेनेला आमच्यासोबत युतीच करायची नसेल तर भाजपकडूनही तसा प्रस्ताव देण्याचा विषय संपतो. युती करण्यासाठी दोन पक्ष राजी व्हावी लागतात. नुसते आम्ही युती व्हावी म्हणून काय उपयोग अशी नाराजीचा सूरही मुनगंटीवार यांनी लावला.