…तर मुलींना तब्बल 21 हजारांचा दंड

0

मथुरा । गुन्हेगारीवर आळा बसावा म्हणून विविध उपाय योजना केल्या जातात. पण, मडोरा गावातील पंचायत समितीच्या पंचांनी गुन्हेगारी आळा बसवण्यासाठी अनोखा फतवा काढला आहे. जर एखादी मुलगी रस्त्यात फोनवर बोलताना आढळली तर तिला तब्बल 21 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. सोबत गावांतील अन्य गुन्ह्यांवर अंकुश लावण्यासाठीही पंचांनी गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहून गुन्हेगारांवरील दंडाची रक्कमही निश्चित केली आहे. गोवर्धनमधील मडोरा गावात झालेल्या पंचायत बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.

गोवर्धनमधील मडोरा गावात गुन्हे आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी रविवारी एक पंचायत बोलावण्यात आली होती. गुन्ह्याच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगाराला शिक्षा ठोठावण्यात यावी, असे मत यावेळी बैठकीत सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी पंचांसमोर मांडले. यावेळी पंचांनीही ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यानुसार निर्णय दिला.

फसवणूक, जुगार, दारू प्यायल्यास 11 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाणार, असा निर्णय पंचांनी घेतला व त्यांच्या या निर्णयाला ग्रामस्थांनीही सहमती दर्शवली. शिवाय, गुन्हा घडल्यास त्याची शिक्षा संबंधितांना ठोठावण्यासाठी वेगवेगळ्या समिती स्थापन करण्यात येतील, असेही पंचांनी सांगितले. यावेळी त्यांनी असाही निर्णय घेतला की जर एखादी मुलगी रस्त्यात फोनवर बोलताना आढळली तर तिला 21 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.

गावात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू दिला जाणार नाही, असा निर्धारही यावेळी गावाचे प्रमुख उस्मान यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे माजी प्रमुख मोहम्मद यांनी सांगितले की, मगावातील वॉन्टेड गुन्हेगारांना लवकरच मुसक्या आवळण्यात येतीलफ. शिवाय, गुन्हेगारांनी पंचांकडून देण्यात आलेला निर्णय स्वीकारला नाही तर पोलिसांच्या मदतीनं त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असेही ठरवण्यात आले.