… तर रेशनिंग दुकानदारांवर मेस्मा लावणार!

0

संपाच्या पार्श्वभूमीवर गिरीष बापट यांचा इशारा

मुंबई :- राज्यभरातील ५६०० रेशन दुकानदारांनी संप पुकारला असून हा संप त्यांनी मागे घ्यावा. सरकार केव्हाही चर्चेला तयार आहे. संप मागे न घेतल्यास या रेशनिंग दुकानांवर मेस्मा अंतर्गत किंवा आणखी दुसऱ्या पद्धतीने कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीष बापट यांनी दिला आहे.

रेशन दुकानदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी या दुकानदारांनी १ एप्रिलपासून संप पुकारला आहे. मात्र या संपामुळे ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या धान्यपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने त्यांनी हा संप मागे घ्यावा, असे आवाहन गिरीष बापट यांनी केले. राज्यात ५१९७८ रेशनिंग दुकानदार असून त्यापैकी ५६०० दुकानदारांनी संप पुकारला आहे. सरकारी सेवेत सामावून घेऊन त्यांना दरमहा ५० हजार रुपये वेतन द्यावे ही दुकानदारांची मागणी व्यवहार्य नाही. याव्यतिरिक्त अन्य सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. रेशनिंग दुकानांमध्ये पॉस मशीन लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या दुकानांच्या जागेवर त्यांना धान्यपुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे या पॉस अंतर्गत बँकांप्रमाणे ग्रामीण जनतेला पैसे देण्याची सेवाही त्यांना देता येणार आहे. यातून त्यांना कमिशनही मिळणार आहे. असे असताना त्यांनी संप पुकारणे योग्य नसून संप मागे घ्यावा. त्यांच्याशी चर्चा करण्यास सरकार तयार असे गिरीष बापट म्हणाले.

संपावर गेलेले दुकानदार
रायगड जिल्हा – १९७, सांगली – ७२५, बीड -१९५५, धाराशीव – ६०९, परभणी -७६४, लातूर – १३५०