माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची टीका
सांगवी :पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याचा फसवा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. हजारो घरे अनधिकृत आहेत. ही घरे अधिकृत करण्याची प्रमुख मागणी घेऊन अनेकदा आंदोलन होत आहेत. सरकारने घेतलेल्या शास्तीकराच्या निर्णयामुळे अनेक नागरिकांची मने दुखावली आहेत. अनधिकृत घरवाल्यांना याचा त्रास होतो आहे. भविष्यात शास्तीकराच्या भुर्दंडामुळे शहरातील नागरिक महापालिकेत येऊन आत्महत्येचा प्रयत्न करतील या भीतीने पालिकेच्या मुख्यालयात सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. अशा घटना परिसरात भविष्यात घडु नये म्हणुन सत्ताधारी भाजपच्या प्रतिनिधीनी व महापालिकेने संपूर्ण पिंपळे गुरव परिसराला जाळी मारुन घ्यावी, अशी टीका माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
मंत्रालयात केली आत्महत्या
पूर्ण कर्जमाफी देणार म्हणून आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र महाराष्ट्रातील शेतकर्यांनी फसव्या कर्जमाफीला कंटाळुन मुंबई मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे मंत्रालयात सुरक्षा जाळी बसविण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षे सत्ता असताना कधीही लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला नव्हता. राष्ट्रवादी शहराला नेहमी विकासाकडे घेऊन जात होती मात्र दीड वर्ष भाजपची सत्ता मिळालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला सुरक्षा जाळी बसविण्यावी नामुष्की ओढवली आहे. महानगरपालिकेत स्वच्छ कारभाराचा डांगोरा पिटत भारतीय जनता पक्षाचा भष्ट्राचारयुक्त कारभार चालु आहे अशी टिका जगताप यांनी केली आहे.