नवी दिल्ली – पंजाब सरकारमधील मंत्री तसेच माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर पाकिस्तान दौऱ्यामुळे आरोप होत आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार आपण पाकिस्तानमध्ये गेलो होतो असे नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले होते. राहुल गांधी माझे कॅप्टन आहेत अमरिंदर सिंग नाही असे विधान सिद्धू यांनी केले होते. याच वक्तव्यावरून त्यांच्याच सरकारमधील मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची माणी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे माजी लष्कर कॅप्टन आहेत. सिद्धू हे अमरिंदर यांना कॅप्टन समजत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारीनुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बजवा यांनी केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिले आणि आधीच्या आपल्या वक्तव्यावरून त्यांनी घूमजाव केले. करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने वाद निर्माण झाला आहे. पण ‘राहुल गांधी यांनीच आपल्याला पाकिस्तानला जायला सांगितले होते, असा दावा सिद्धू यांनी केला होता. त्यावरून नवा वाद निर्माण होताच, सिद्धू यांनी घूमजाव केले.