तलवारीच्या धाकावर लूट करणार्‍या आरोपींना तीन वर्ष शिक्षा

0
मुक्ताईनगर न्यायालयाचा निकाल ; आरोपींना पाच हजार रुपये दंड भरण्याचे आदेश
मुक्ताईनगर : तलवारीचा धाक दाखवून दोन लाख रूपयांची जबरी चोरी करणार्‍या तिघा आरोपींना बुधवारी मुक्ताईनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. अजबराव किसन गायकवाड (रा.वडोदा, पानेरा, ता.मलकापुर, जि.बुलढाणा) यांच्याकडील दोन लाख सात हजारांची रोकड मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव चौफुली महामार्गावर संशयीत आरोपी सतनामसींग जयालसिंग हरीयाल (रा.वाघुळ, ता. मलकापुर, जि.बुलढाणा), गोपाळ रमेश गावंडे (रा.पोफळी, ता.मलकापूर )व मधुसुदन शालीग्राम सपकाळ (रा.टाकळी, ता.मलकापुर, जि.बुलढाणा) या तिघांनी तलवारीचा धाकावर लांबवली होती. 10 जानेवारी 2009 रोजी ही घटना घडली होती. मुक्ताईनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तर फिर्यादी अजबराव गायकवाड यांनी मुक्ताईनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.
नऊ वर्षांनंतर आरोपींना लागली शिक्षा
संशयीत आरोपी पसार असल्याने व तिघे आरोपी  एकत्र येत नसल्याने खटला लांबला होता. अखेर बुधवार, 21 मार्च रोजी मुक्ताईनगर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए.सरदार यांनी खटल्यातील तिघाही आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजाराचा दंड सुनावला. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता आसमा शेख यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार जी.के. फालक यांनी सहकार्य केले. मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग व सहकार्‍यांनी गुन्ह्याचा तपास केला.