वार शिवारात पश्चिम देवपूर पोलिसांची कामगिरी
धुळे : दुचाकीवरून जाणार्या संशयीत तरुणांचा पाठलाग केल्यानंतर दोन तलवारीसह लोखंडी कोयता व रॉड जप्त करण्यात आली. आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पश्चिम देवपूर पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री वार शिवारात ही कारवाई केली. पश्चिम देवपूर पोलिसांचे पथक रात्रीच्यावेळी गस्त घालत असताना देवपुरातील इंदिरा गार्डनजवळ चार तरूण दोन दुचाकींवर जातांना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्यांना थांबवले मात्र संशयीत पसार झाल्याने पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपींनी दुचाकींसह शस्त्र वार शिवारात सोडून पोबारा केला. या गस्ती पथकात पोलीस उपनिरीक्षक एस.के. पाटील, संजय पाटील, जी.आर.आखाडे, सुभाष मोरे आदींचा समावेश होता.