तलाठींअभावी पिंपळे खालसा, हिवरेवासीयांचे दाखले रखडले

0

शिक्रापूर । शिरुर तालुक्यातील पिंपळे खालसा व हिवरे येथील तलाठी कार्यालय नेहमीच बंद राहत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयात तलाठी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांची शासकीय कामे रखडली आहेत. येथे कायमस्वरूपी तलाठी नेमण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पिंपळे खालसा व हिवरे या दोन्ही गावांसाठी एकच तलाठी आहे. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून तलाठी कार्यालयात तलाठी उपलब्ध होत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांची कामे रखडली आहेत. येथे सध्या तात्पुरत्या नियुक्तवर असलेल्या तलाठ्यांवर इतर पाच गावांचा देखील कारभार असल्यामुळे त्यांना या गावांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे ते या गावांकडे येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. येथे नियुक्त असलेल्या तलाठींना साप्ताहीक सुट्टीच्या दिवशी येथे थांबण्याचे आदेश द्यावेत, येथे कायमस्वरूपी तलाठी नेमण्याची मागणी पिंपळे खालसाचे सरपंच राजाराम धुमाळ व हिवरेच्या सरपंच माया जगताप यांनी लेखी पत्राद्वारे शिरुरचे तहसीलदार रणजीत भोसले यांच्याकडे केली आहे.

तलाठ्यांची कमतरता
याबाबत शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, शासनाच्या धोरणानुसार ऑनलाईन सातबारा नोंदणी कामांमुळे तलाठ्यांच्या बदल्या थांबविण्यात आलेल्या आहेत. तसेच सध्या तलाठी कमी असल्यामुळे काही तलाठ्यांना जादा गावांचा कारभार देण्यात आलेला आहे. परंतु पिंपळे खालसा व हिवरे या गावाच्या अडचणी सोडविण्यासाठी आठवड्यातून एक-एक दिवस त्या गावांमध्ये थांबण्याचे लेखी आदेश तेथील तलाठ्यांना देणार असल्याचे सांगितले.

…तर कार्यालयाला टाळे ठोकू
पिंपळे खालसा व हिवरे येथील तलाठी कार्यालय अनेक दिवसांपासून बंद आहे, शिरूर तहसील कार्यालयाकडे वारंवार मागणी करून देखील या गावांना अद्यापपर्यंत तलाठी नेमण्यात आलेले नाही. नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. येथे लवकरच तलाठी नेमण्यात आले नाही तर तलाठी कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी सरपंच राजाराम धुमाळ यांनी दिला आहे.