तलाठ्यांना मारण्याचा माफियांचा प्रयत्न फसला

0

इंदापूर । विनापरवाना चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडल्याचा राग मनात धरून ट्रक मालकाने मंडल अधिकारी व तलाठी यांना दमदाटी, शिवीगाळ करून जबरदस्तीने ट्रक पळवून नेत चालत्या ट्रकमधून उडी टाकून गाडीत बसलेल्या दोन तलाठ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. ट्रक मालक युनुस पठाण (रा. वालचंदनगर, ता. इंदापूर) व गाडीचा ड्रायव्हर सचीन विठ्ठल मोहित (रा. लासुर्णे ता. इंदापूर) यांच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, तलाठ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व पकडलेली गाडी दमदाटी व शिवीगाळ करून जबरदस्तीने पळवून नेली या आरोपावरून इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदैवाने प्राण वाचले
याबाबतची लेखी फिर्याद मंडल अधिकारी गिरीश राघवेंद्र संदीकर (लासुर्णे सजा) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार इंदापूर तालुक्यातील निरा नदी पात्रातून बेकायदा वाळूचे उत्खनन करून चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई करताना हा प्रकार घडला. ट्रकचा वेग कमी असल्याने व तो शेजारच्या शेतातील कलिंगडाच्या रानात जाउन ऊभा राहील्याने गाडीतील पंडीत वाघमारे व शिवाजी खोसे या तलाठ्यांचे प्राण थोडक्यात वाचले. संबंधीतांवर कायदेशीर फिर्याद दाखल केल्याचे मंडल अधिकारी गिरिश संदीकर यानी सांगीतले.पोलिसांनी वाळूचा ट्रक जप्त केला आहे. आधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक महेंद्रसिंह निंबाळकर करत आहेत.