पालघर । अवैद्य गौनखनिज उत्खनन व वाहतुकीला आला घालण्यासाठी पालघर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकार्यांच्या समित्या नेमण्यांत आल्या आहेत. ह्या समित्या जरी नेमण्यांत आल्या असल्या तरी अहमदाबाद महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेती वाहतुक सरास चालू आहे. या कारवाई दरम्यान हलोली (पडोसपाडा) येथे तलाठ्याला शिवीगाळ करण्याची घटना घडली आहे. अशा चोरट्या रेती वाहतुकीवर कारवाई करणार कशी असा प्रश्न निर्माण झाला असून हलोली (पडोस पाडा) या ठिकाणी तलाठी संजय चुरी यांनी हायवा ट्रक क्रमांक एम एच 48 ए वाय 3455 तपासणीसाठी थांबविला असता वाहन चालकाकडे खडी वाहतुकीचा बोगस परवाना असल्याचे आढळून आले.
त्यावेळी वाहन मालक नितेश पाटील हा आपल्या गाडीमधून येऊन तलाठी चुरी यांना लाकडी दंडका दाखवून शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे तलाठी चुरी यांनी वाहन मालक नितेश पाटील (भोपिवली), चालक यासीन शेख व धोंडिबा कांबळे (पेल्हार) या तिघांविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे. मागील महिन्यामध्ये वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकार्यांवर नदीमध्येच हल्ला झाला होता. तसाच प्रकार हलोली येथे अवैद्य वाळू वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी महसूल अधिकारी गेले असताना तलाठ्याला लाकडी दांडके दाखवून शिवीगाळ करण्यांत आली. याप्रकरणी संबधित तलाठ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.