तलाव क्षेत्रातील पावसाच्या तुरळक सरींमुळे मुंबईकरांना दिलासा!

0

मुंबई । मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण आदी परिसरात सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. गरमीचा कहर सहन करणार्‍या मुंबईकरांना या पावसामुळे थोडा फार गारवा व काहीसा दिलासा मिळत आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाऊस नुसताच मुंबईत पडून उपयोगाचे नाही, तर हा पाऊस पाणीपुरवठा करणार्‍या तलावात पडणे व त्यामुळे मुबलक पाणीसाठा तयार होणे फार गरजेचे आहे. त्यादृष्टीने या मान्सून पावसाच्या तुरळक सरी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावात पडल्याने मुंबईकरांना त्यातच आणखीन एक सुखद वार्ता लाभली आहे. आतापर्यंत तीन वेळा मान्सूनपूर्व पाऊस पडला आहे. पाणीपुरवठा करणार्‍या सातही तलावांत किमान 10 मि.मी. ते 92 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अप्पर वैतरणा तलावात – 30 मि.मी., मोडक सागर तलावात – 28 मि.मी., तानसा तलावात – 13 मि.मी., मध्य वैतरणा तलावात – 10 मि.मी., भातसा तलावात – 62 मि.मी., विहार तलावात – 122 मि.मी. तर तुळशी तलावात – 92 मि.मी.
इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

यामध्ये सर्वात कमी पाऊस मध्य वैतरणा तलावात तर सर्वात जास्त पाऊस विहार तलावात पडला आहे. गतवर्षीही केवळ अप्पर वैतरणा तलाव वगळता सर्वच तलावात किमान 0.20 मि.मी. ते 118 मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद पालिका प्रशासनाकडे आहे. मुंबईत सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असून नियमित पाऊस येत्या 9 किंवा 10 जूनपासून सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांत एकूण 2,56,101 दशलक्ष लिटर म्हणजे 17.69% इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पुढील 65 दिवस म्हणजे 10 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. मुंबईला संपूर्ण वर्षभरासाठी तलावांत एकूण 14,47,363 दशलक्ष लीटर इतक्या पाणीसाठ्याची गरज असते. मुंबईला दररोज 3,900 दशलक्ष लीटर
इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्यापैकी 150 दशलक्ष लीटर पाणीसाठा हा ठाणे, भिवंडीला पुरवला जातो. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा तलावात – शून्य दशलक्ष लीटर, मोडक सागर – 50,457 दशलक्ष लीटर, तानसा – 22,263 दशलक्ष लीटर, मध्य वैतरणा – 84, 510 दशलक्ष लीटर, भातसा – 91, 481 दशलक्ष लीटर, विहार – 5, 059 दशलक्ष लीटर, तुळशी – 2,330 दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे.