पुणे : महापालिकेने तळजाई टेकडी येथे उभारलेल्या क्रिकेट मैदानासाठीच्या पार्किंग व्यवस्थेसाठी मैदानापलीकडील बाजूस तोडल्या जाणार्या वृक्षांबाबत महापालिका प्रशासनच अनभिज्ञ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
तळजाई टेकडी क्रिकेट मैदानाच्या परिसरात सौरऊर्जा शेड उभारले जाणार असल्याचे महापालिकेच्या भवन विभागाने म्हटले आहे. त्यासाठी प्रशासनाने निविदा काढून ठेकेदाराची नेमणूकही केली आहे. मात्र, या कामात झाडे आहेत किंवा नाहीत, याची माहितीच ही निविदा काढणार्या भवन विभागास नसल्याचे शुक्रवारी समोर आले. महापालिकेने तळजाई टेकडीची जागा न्यायालयात लढा देऊन मिळविली आहे. त्या ठिकाणी न्यायालयाने फक्त वृक्षारोपणासाठी जागा दिलेली आहे. असे असताना, या भागात बांधलेल्या मैदानासाठी सुमारे अडीच ते तीन एकर जागेत पार्किंग उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाचे नाव पुढे करण्यात आले आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेड उभारून खाली पार्किंग केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी निवडलेल्या या जागेत दाट झाडी आहे. त्यात सुमारे 300 झाडांचा समावेश आहे. अशाप्रकारे सौरऊर्जा प्रकल्पाचे नाव पुढे करून ही वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी ठेकेदाराचे कर्मचारी झाडांची गणना करण्यास आले होते. त्यानंतर ही झाडे तोडण्यात येणार होती.मात्र, काही वृक्षप्रेमींकडून ही माहिती मिळताच या ठिकाणी नगरसेवक सुभाष जगताप यांनी तातडीने हे काम थांबविले.
या प्रकाराबाबत शुक्रवारी भवन विभागाचे प्रभारी प्रमुख शिवाजी लंके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या कामाची फाईल पाहिल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही, असे सांगितले. या कामाची निविदा काढून त्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र, झाडे जातात किंवा नाही याची आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे निविदा काढून काम दिलेल्या प्रकल्पाची माहिती विभाग प्रमुखालाच कशी नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तातडीने हे काम रद्द करावे, अशी मागणी नगरसेवक जगताप यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.