तळवडेत लवकरच ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरूवात

0

गॅस व पेट्रोल कंपन्यांची परवानगी

तळवडे : तळवडे परिसरामध्ये ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर व पाइपलाईनच्या कामाला गेल इंडिया गॅस कंपनी आणि एपीसीएल कंपनीच्यावतीने हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाइन व पाणीपुरवठ्याचा रखडलेला प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. तळवडे परिसरातील संत तुकारामनगर परिसरातील राजा शिवछत्रपती विद्यालयाच्या बाजूला लोकवस्ती वाढली असल्यामुळे ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची मागणी नागरिक करीत होते. या शाळेमध्ये बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत असून ड्रेनेज लाईन नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. लोकवस्ती वाढल्यामुळे या परिसरात पाणीपुरवठाही कमी दाबाने होत असल्याने नागरी सुविधा मिळत असल्याची तक्रार नागरीक करीत होते.

महापालिकेच्यावतीने या परिसरात ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याचे काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले. परंतु या कामास गॅस कंपनीच्यावतीने हरकत घेण्यात आली व काम बंद पडले. त्यानंतर परिसरातील नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे तसेच महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना पाठपुरावा करून कामासाठी परवानगी मिळविली. कित्येक दिवसांचा प्रश्‍न सुटणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पाठपुरावा करून परवानगी मिळविली
नगसेवक प्रवीण भालेकर यांनी सांगितले की, ड्रेनेजलाईन, स्ट्रॉम लाईन बर्‍याच दिवसांपासून रखडलेला प्रश्‍न होता. संत तुकाराम नगरमधील नागरिक आणि राजा शिवछत्रपती शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रेनेजलाईनची मोठी गरज होती. डेल आणि एचपी कंपन्या परवानगी देत नव्हते. आमचे पॅनेल निवडून आल्यानंतर अधिकार्‍यांना पाठपुरावा करून कंपन्यांशी संपर्क साधून ही परवानगी मिळविली. परिसरातील नागरिक व विद्यार्थी यांच्यासाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.

निधी माफ केला
नगरसेवक पंकज भालेकर म्हणाले की, संत तुकारामनगरमधील नागरिकांची ड्रेनेज, स्ट्रॉम लाईन व पिण्याच्या पाण्याची समस्या होती. या परिसरात काम सुरू केले आहे.कंपन्यांशी संपर्क साधून नागरिकांच्या व वि÷द्यार्थ्यांच्या अडचणींबद्दल समजावून सांगितले. शिवाय लोकसेवेच्या कामाचे कौतुक करीत जोखीम निधी व पर्यवेक्षण निधी माफ केला.

काही अटींवर मिळाली परवानगी
जलनिस्सारण विभागाचे कनिष्ठ अभियंता योगेश आल्हाट म्हणाले की, या परिसरात गेल इंडिया गॅस कंपनी व एपीसीएल पेट्रोल कंपनी यांच्या वाहिन्या आहेत. या भागात खोदकाम करण्यास परवानगी घेणे आवश्यक होते. त्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा चालू होता. काही अटींच्या अधीन राहून काम करण्यास परवानगी मिळाली. यामध्ये काही दुर्घटना घडल्यास युनायटेड इंडिया यांच्याकडून 2.5 कोटी रुपयांचा विमा उतरविला आहे. त्यासाठी महापालिकेने एक लाख 39 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.