तळीरामांना दारुसाठी टोकन पध्दत

0

मुंबई – तळीरामांना दारू हवी असेल, तर त्यांना आधी एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. त्यात नाव, मोबाइल नंबर, कोणत्या ब्रँडची दारू हवी आहे आणि किती हवी आहे, असा सगळा तपशील द्यावा लागणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त कांतीलाल उमाप यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे.

या आदेशात दारू दुकानदारांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांना उभे करण्यासाठी मार्किंग करावे लागेल व दोन मार्किंगमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असेल. दुकान सुरू करण्यापूर्वीच जे ग्राहक उभे असतील त्यांना त्या मार्किंगच्या ठिकाणी उभे करण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. ग्राहकांना त्यांची ऑर्डर देण्यासाठी एक मागणीपत्राचा नमुना देण्यात येईल. त्यात अनुक्रमांक, ग्राहकाचे नाव, मोबाइल नंबर आणि कुठल्या ब्रॅण्डची दारू हवी आहे व किती हवी आहे हे सगळे ग्राहकाला लिहून द्यावे लागेल. मागणीपत्र ग्राहकाकडून भरून घेतल्यानंतर त्याला टोकन क्रमांक देण्यात येईल. टोकन उपलब्ध नसतील तर कोर्‍या कागदावर दुकानदाराने स्वत:च्या दुकानाचा शिक्का व दूरध्वनी क्रमांक नमूद करून अनुक्रमांक द्यावा. तो अनुक्रमांक व ग्राहकांना दिलेल्या अनुक्रमांक हा सारखा असावा.

दारू दुकानदाराने दर १५ मिनिटानंतर अथवा गरजेनुसार कोणत्या ग्राहकाच्या टोकन क्रमांकाची सर्व्हिस चालू आहे ते बोर्डवर नमूद करावे. उत्पादनशुल्क विभागाचे उपायुक्त, अधीक्षकांनी सातत्याने दारू दुकानांसमोरील गर्दी नियंत्रणाची व सोशल डिस्टन्सगची पाहणी करावी व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आदी सुचना देण्यात आल्या आहेत.