तळेगावकरांनी अनुभवले ‘किमयागार’चे सामर्थ्य

0

तळेगाव दाभाडे : ‘किमयागार’ हे वि.वा. शिरवाडकर व सदाशिव अमरापूरकर लिखित आणि संपदा जोगळेकर दिग्दर्शित नाटक कै. राजाभाऊ साठे स्मृती पुष्प मालिकेतले आणि कलापिनी कलामंडळाचे या वर्षातले शेवटचे नाटक कलापिनी सांस्कृतिक केंद्रात सादर झाले. हेलेन केलर यांच्या बालपणावर आधारित हे नाटक आहे. डोळ्यांना जसा उजेड तशी मनाला भाषा या टॅगलाईन प्रमाणे या नाटकातील संवादाची भाषा रसिकांच्या मनाला भिडली. जन्मतःच आंधळी, बहिरी आणि मुकी असलेली हेलन आणि तिला यातून बाहेर काढून एक माणूस म्हणून जगायला शिकवण्यासाठी जीवापाड संघर्ष करणारी तिची प्रशिक्षिका अ‍ॅनीचा विलक्षण प्रवास या रंगमंचाच्या मर्यादेत मांडण्याचे शिवधनुष्य जोगळेकर-कुलकर्णी यांनी उचलले व सर्व कलाकार, तंत्रज्ञांनी ते तेवढ्याच सामर्थ्याने पेललं.

उत्तम कलाकृतीची अनुभूती
छोट्या हेलनची भूमिका साकारणार्‍या तृष्णिका शिंदे व अ‍ॅनीची भूमिका करणार्‍या संपदा जोगळेकर यांनी आपल्या सशक्त अभिनयातून रसिकांना काही नर्म विनोदी तर काही उत्कट क्षण अनुभवायला दिले आणि रसिकांची तेवढीच उत्कट दाद मिळवली. अमेरिकेचा आभास करणारे नेपथ्य आणि उत्तम परिणाम साधणारी प्रकाश योजना प्रयोगाची उंची वाढविणारी होती. परिक्षित भातखंडे यांच्या पार्श्वसंगीताने उत्कटतेचा कळस गाठत प्रेक्षकांना हळवे केले. एक उत्तम कलाकृती पाहिल्याची अनुभूती रसिकांच्या प्रतिसादातून जाणवली. जोगळेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत तळेगावच्या दोन दिव्यांग(अंध) महिलांचा व त्यांना अंधत्वावर मात करण्यास शिकवणार्‍या डॉ. स्वाती वेदक आणि त्यांच्या सहकार्‍यांचा नाटकाच्या टीमच्या वतीने गौरव केला. आयोजन चेतन शहा व विनायक अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलापिनीच्या युवा कार्यकर्त्यांनी केले. विश्वस्त शिरीष जोशी यांनी कलाकारांचा सन्मान केला. डॉ.अनंत परांजपे यांनी आभार मानले.