तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती करण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी दारांच्या मिळकती सील केल्यामुळे थकबाकीदारामध्ये भीतीचे वातारवण निर्माण होऊन नगरपरिषदेमध्ये कर भरण्यासाठी मिळकतदारांची प्रचंड गर्दी होत असल्याने नगरपरिषदेच्या भरणा वाढला आहे.
…रोज 30 लाखांचा भरणा
नगरपरिषदेची मिळकतकर वसुली अभियान सध्या वेगाने चालविण्यात येत असून वसुलीसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार शहरातील मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय काहीची मालमत्ता सील केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून आपला भरणा करण्यासाठी मिळकत दारांनी नगरपरिषद कार्यालयात धाव घेतल्याने कर भरण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. दररोज सुमारे 25 ते 30 लाखापर्यंत भरणा होत असल्याचे चित्र दिसत आहे.