तळेगाव नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोठी कारवाई 

0
तळेगाव स्टेशन चौक ते एस टी.स्थानकापर्यंत रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे टपर्‍या
80 पेक्षा अधिक टपर्‍या जमीनदोस्त 
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून तळेगाव स्टेशन चौक ते एस.टी.स्थानकापर्यंत रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे असणार्‍या व्यावसायिकांची दुकाने पोलीस नेस्तनाभूत करून तळेगावातील दुसरी मोठी कारवाई पार पडली. काही दिवसांपूर्वी तळेगाव रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील अनधिकृत दुकाने, टपर्‍या व इतर व्यावासायिकाची व्यवसायाची ठिकाणे अनधिकृत असल्याने नगरपालिकेने मोठी कारवाई केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गुरूवारी सकाळी 11च्या सुमाराला पोलीस स्थानकातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, पोलीस निरीक्षक नारायण पवार, दळवी यांचे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलीस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 40 पोलीस कर्मचारी, 10 महिला पोलीस कर्मचारी हा ताफा घेऊन स्टेशन चौकात आले. तर नगर परिषदेकडून मुख्याधिकारी वैभव आवारे, सर्व विभागाचे प्रमुख व नगर परिषद कर्मचारी स्टेशन चौकात आले. या कारवाईसाठी 5 जेसीबी, 1 फोकलंड, 4 ट्रॅक्टर यांचा वापर करण्यात आला.
स्टेशन चौक गजबजलेला
स्टेशन चौक हा नेहमी गजबजलेला चौक असतो. याठिकाणी अनेक कामासाठी अनेक ठिकाणावरून नागरिकांची कामासाठी ये-जा असते. प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या नोटीसा संबधितांना बजावल्या होत्या. गुरूवारीअचानक सकाळी कारवाईला सुरुवात केली. यामध्ये अनेकवर्षांपासून हॉटेल, मेडिकल, किराणामाल, शिवणकाम, कोंड्रीक्स, हारविक्रेते, गॅरेज, चहाच्या टपर्‍या इत्यादी व्यवसाय थाटलेली दुकाने होती. या सर्व आपले नेहमीप्रमाणे ते व्यवसायात मग्न होते. अचानक आलेल्या कारवाईला सामोरे जाताना त्यांना अवघड परस्थितीला सामोरे जावे लागत होते. लेखी सूचना करूनही व्यापार्‍यांनी अतिक्रमण संदर्भात दखल न घेतल्याने नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. मात्र अशा प्रकारच्या नोटिसा न मिळाल्याचा आरोप काही व्यापार्‍यांनी केला आहे. गुरुवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे, विविध खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, निरीक्षक नारायण पवार आदी उपस्थित होते.
सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी 
नगरपरिषदेतील बांधकाम, आरोग्य, अतिक्रमण आदि विभागातील सर्वच कर्मचारी सक्रियपणे अतिक्रमण काढत होते. नोव्हेंबर नंतर तळेगाव स्टेशन हद्दीतील ही दुसरी मोठी कारवाई आहे. अतिक्रमण काढताना नगरपरिषद अधिकारी व नागरिक यांच्यात काही ठिकाणी शाब्दिक चकमकी उडाल्या. शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी तीनजणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून थाटलेली दुकाने डोळ्यांदेखत तुटत असल्याने अनेकांचे डोळे पाणावले. दरम्यान, तळेगाव स्टेशन येथील शुभम कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस असलेली भाजी मंडई जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मायमर कॉलेजचे अनधिकृत बांधकाम
भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे संस्थापक व नगरसेवक अरुण माने यांनी लेखी पत्राद्वारे मुख्याधिकारी आवारे यांना लिहिले की, आपण सर्वसामान्य जीवन जगणार्‍यांवर कारवाई करता. परंतु मायमर कॉलेजने एवढे अनधिकृत बांधकाम केले असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ही कारवाई करण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांना जो न्याय तोच इतरांनाही लावला पाहिजे.