‘त्या’ जागेवर तात्काळ स्थलांतरित होण्याचे आवाहन*
तळोदा: शहरातील विद्यानगरी, जोशी नगर प्रल्हाद नगर, गणपती मंदिर आनंद चौक, खर्डी नदी (यात्रेचा जागी) विमल नगर, प्रताप नगर अशा आठ जागा भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी तात्काळ त्या जागेवर स्थलांतरित व्हावे. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी भाजीपाला विक्री केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व विक्रेत्यांनी मास्कच्या वापराशिवाय भाजीपाला विक्री करू नये. तसेच नागरिकांनी त्यांच्याजवळील भाजीपाला विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करावा. उगाच इतरत्र ठिकाणी भाजीपाला घेण्यास गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वा.सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा भाग तळोदा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला तहसीलदार पंकज लोखंडे, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.
नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्याकरिता चारचाकी, दुचाकी, स्कुटी आदी वाहनांचा वापर करू नये. कोरोना विषाणूंचे हॉट स्पॉट असलेले शहर धुळे, मालेगाव, पुणे, मुंबई, ठाणे तसेच इतर राज्यातून येणारे नागरिक यांनी स्वतःहून तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय तळोदा यांच्याशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी.
किराणा दुकान भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी मार्किंग करणे, खरेदीसाठी आलेल्या दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर ठेवणे तसेच सार्वजनिक ठिकाणी (रस्ते बाजार कार्यालय) थुंकू नये अशा नियमांचे पालन बंधनकारक आहे. यापैकी कोणतेही नियम न पाळणार्या व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रतिबंधक कायदा 1987 अन्वये कारवाई करण्यात यावी.
कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना विषाणू नियंत्रण कक्ष( दूरध्वनी क्रमांक 02567- 232367) तहसील कार्यालय येथे स्थापन केले आहे. या कक्षामध्ये प्रकल्प अधिकारी महिला, बालविकास पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. संचारबंदी काळातील या कार्यालयाकडून अत्यावश्यक कामासाठी/सेवेसाठीचे दिले जाणारे पास मिळण्यासाठी दिलेल्या ई-मेलवर आवश्यक कागदपत्रांसह स्कॅन करून अर्ज दाखल करता येतील, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.