तळोदा । सातबारा यात काही असतील तर त्या लक्षात याव्यात आणि त्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी, यासाठी सातबारा दुरुस्ती आणि चावडी वाचन ही विशेष मोहीम सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्यानुसार तळोदे तालुक्यात सुद्धा या मोहिमेस प्रारंभ झाला असून काकलपूर, मोदलपाडा व इच्छागव्हाण या गावांत चावडी वाचन झाले असून, तालुक्यातील उर्वरित गावांत लवकरच क्रमाक्रमाने चावडी वाचन मोहीम राबविण्यात येणार आहे. दफ्तरातील सातबारा आणि संगणकावरील सातबारा यामध्ये तफावत असल्याने, सध्या सातबारा डिजीटल स्वाक्षरीने दिला जात नाही आणि ही तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा वतीने ई – फेरफार कार्यक्रमांतंर्गत, सातबारा दुरुस्ती व चावडी वाचन ही मोहीम राबविण्यात येत आहे.
1 ऑगस्टपासून होणार डिजीटलचे वाचन
या मोहीमेंतंर्गत 15 मे ते 15 जून 2017 पर्यंत संगणीकृत सातबार्याचे चावडी वाचन करण्यात येत आहे. यावेळी गावातील नागरिकांनी प्रत्यक्ष हजर राहून सातबार्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करावयाची आहे. तळोदे तालुक्यात सुद्धा या मोहिमेस प्रारंभ झाला असून काकलपूर, मोदलपदा व इच्छागव्हाण येथे चावडी वाचनाचे काम पूर्ण झाले असून सावरपाडा, सोमावल ब्रु., करडे, कढेल, अलवान, हलालपुर, माळखुर्द, पाठडी, खर्डी ब्रु., रेटपाडा, लोभाणी, गुंजाळी, गौळणपाडा, चौगाव खु., गाढवली, बुधावली, सोमावल खु., शेलवाई, सतोना, सावर, रामपूर, कुंडवे आदी गावात लवकरच चावडी वाचनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे आणि उर्वरित गावात सुद्धा संगणकीय काम पूर्ण झाल्यावर चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचनांनंतर 16 जून ते 31 जुलै 2017 पर्यंत संगणकीकृत सातबार्यामध्ये काही आक्षेप असल्यास, आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत आणि 1 ऑगस्टपासून डिजीटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध होणार आहे.
शेतकर्यांचा चकरा होणार बंद
येत्या 1 ऑगस्टपासून ऑनलाईन पैसे देऊन / डिजीटल पेमेंटने महा ई सेवा केंद्रातून अथवा महाभूलेख संकेत स्थळावरुन किंवा आपले सरकार पोर्टल वरुन डिजीटल सहीचा वैध कायदेशीर सातबारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना सातबार्यांसाठी तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता राहणार नाही आणि एकूणच त्यांचा वेळेची व पैशांची बचत होण्यास मदत होणार आहे.
शासनाची अतिशय उपयुक्त अशी ही मोहीम आहे. तळोदे तालुक्यात एकूण 94 गावात चावडी वाचनाचे काम होणार आहे. ज्या गावात 100 टक्के संगणकीय काम झाले आहे, अश्या गावांमध्ये आधी चावडी वाचन करण्यात येत आहे आणि उर्वरित गावांमध्ये संगणकीय काम पूर्ण झाल्यावर, लागलीच त्या गावांमध्ये सुद्धा क्रमाक्रमांने चावडी वाचन करण्यात येणार आहे.
– रामचंद्र पवार. तहसीलदार, तळोदा