तळोद्यात कृषी विभाग मदतीसाठी सरसावले

0

तळोदा: लॉकडाऊनमुळे देशासह तालुक्यातील बाजारपेठा बंद असून शेतकरी व उत्पादक वर्गाला भाजीपाला विक्री तसेच फळ विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. तसेच घाऊक व्यापारीही तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येत नाही. अशा भयंकर परिस्थितीवर मात करून शेतकर्‍यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी थेट शेतकरी ते ग्राहक असा विक्रीचा पर्याय शेतकर्‍यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यासाठी तळोद्याचा कृषी विभाग मदतीसाठी सरसावला असून भाजीपाल्याची घरपोच विक्री करीत असल्याचे चित्र आहे. त्याला शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्िंसग, स्वच्छता, पॅकेजिंग आदी सर्व बाबी सांभाळून पालिका, कृषी विभागाच्या मदतीने तळोदा तालुक्यातील प्रथमच अष्टविनायक शेतकरी गटामार्फत शेतात उत्पादित ताजा भाजीपाला शहरवासियांना मिळत आहे. यातून संबंधित शेतकरी गटाला बाजारपेठही उपलब्ध होत आहे. ताजा भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकही खुश आहेत. तालुका कृषी अधिकारी एन.आर.महाले, बी.टी. एम आत्मा विपूल चौधरी, कृषी पर्यवेक्षक सचीन साळवे, बी.एस.पाटील, ए.एच बोरसे, कृषी सहाय्यक दीपक पावरा, प्रमोद देशमुख, साळवे तसेच अष्टविनायक शेतकरी गटाचे अध्यक्ष विजय परदेशी व सदस्य उपस्थित होते.

तालुक्यात कोणत्याही एका गावात सर्व प्रकारचा भाजीपाला पूर्णपणे मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील भाजीपाला उत्पादक असलेले शेतकरी रामेश्वर पाटील, रामकृष्ण पाटील रा.तर्‍हावद, सुरपसिंग ठाकरे रा. पाडळपूर, आनंदा मराठे रा. मोहिदा (क.), गव्हाणीपाडा, सोमवल आदी गावातील शेतकर्‍यांना एकत्रित करून तसेच त्यांच्याकडून भाजीपाला खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केलेला भाजीपाला कृषी विभागाच्या मदतीने व अष्टविनायक शेतकरी गटाच्या सहाय्याने शहरात शेतकरी ते थेट ग्राहकाला विक्री केला जात आहे. भाजीपाल्यासोबत फळेही विक्री केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.