बारामती । शिर्सुफळ तलावातून वाळुचा उपसा होत असल्याची तक्रार तहसील कार्यालयाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत तहसीलदार हनुमंत पाटील यांनी शिर्सुफळ गावची पाहणी केली. वाळू चोरी थांबविण्यासाठी महसूल प्रशासन व पोलिस यंत्रणांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
या तलाव परिसरातील सर्व रस्ते बंद करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या. हा तलाव जलसंपदा खात्याच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या खात्याने येथे कायमस्वरूपी माणूस नेमावा. जलसंपदा खात्याच्या मालकीचा हा तलाव असल्याने वाळूमाफियांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. मंडल अधिकारी व तलाठी यांनी येथील वाळू चोरी होता कामा नये याची दक्षता घ्यावी, ग्रामपंचायतीने वाळूमाफियांविरोधात गुन्हे दाखल करावेत, तसेच नुकसान भरपाईचीही मागणी करावी, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.