तांत्रिक अडचणींमुळेच खेड मधील विमानतळ पुरंदरला हलविले

0

पिंपरी-चिंचवड :पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता.खेड) आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रकल्प तेथे डोंगररांगा आणि बागायती जमीन अधिक असल्याने पुरंदर येथे हलविण्यात आल्याचे राज्य सरकारने लेखी स्वरुपात स्पष्ट आणि मान्य केले आहे. तसेच त्यासाठी भीमा नदीच्या पात्रातही बदल करावा लागणार होता, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावार यांनी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना कळविले आहे.

आढळराव यांच्या विरोधामुळे खेडचे विमानतळ पुरंदरला हलविल्याचा आरोप त्यांचे विरोधक नेहमी करत असतात. विमानतळ रद्द होण्याला आढळराव कारणीभूत आहेत, असा आरोप आगामी निवडणुकीही होण्याचा धोका होता. हा धोका ओळखून आढळरावांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत लेखी विचारणा केली. उद्योग खात्याचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी याबाबत सविस्तर खुलासा केल्याने आढळरावांच्या विरोधातील हा बाण आता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांना नवीन अस्त्र शोधावे लागणार आहे.

खेड येथील विमानतळाचे मोठे कवित्व आहे. या ना त्या कारणामुळे तो गेले दीड तप रखडलेला होता. आढळराव यांच्या मतदारसंघातील खेड तालुक्यात तो होणार होता. त्यासाठी राज्य शासनाने 27 फेब्रुवारी 2009 ला त्याला प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि कोये येथील जागांची पाहणी महाराष्ट् विमानतळ विकास प्राधिकरणाने केली होती. मात्र, या तिन्ही ठिकाणी तांत्रिक अडचण आढळली. त्यातही शेवटच्या तिसर्‍या कोये येथील जागेत तो नक्की होणार, अशी चर्चा सुरु असतानाही ती जागाही प्राधिकरणाला पसंत पडली नाही. भामा नदीच्या पात्रात करावा लागणारा बदल, टेकड्या सपाटीकरण, बागायती शेती या भौगोलिक कारणांमुळे विमानतळ रद्द केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

या तांत्रिक अडचणींमुळे येथील विमानतळ रद्द करण्याची सूचना प्राधिकरणाने केली. त्यानुसार त्याची मान्यता राज्य सरकारने यावर्षी मे महिन्यात रद्द करून तो पुरंदर येथे उभारण्याचा निर्णय 9 मे 2018 रोजी सरकारने घेतला. त्यापूर्वी पुरंदरच्या जागेची पाहणी प्राधिकरणाने ती योग्य असल्याची खातरजमा केली होती, असे येरावार यांनी पत्रात नमूद केले आहे.