नागपूर : ताडोबातील बफर झोनमधील भाम डोली येथे वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. शॉक लागल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भाम डोली येथील एका शेतात शनिवारी सायंकाळी सहा वाजता हा वाघ मृतावस्थेत आढळला. दोन ते अडीच वर्षाचा हा वाघ असून विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ही माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास करत आहेत. वाघाच्या मृत्यूमुळे वन विभाग वाघांची योग्य पध्दतीने निगराणी करीत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वीही ताडोबा बफर झोनमध्ये वाहनांच्या धडकेने आणि शॉक लागल्याने वाघांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.