कल्याण । कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर झोजवाला यांचे कुटुंबीय आणि बांधकाम व्यावसायिकांच्या एमसीएचआय संघटनेच्या पदाधिकार्यांनी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. बांधकाम व्यावसायिकांच्या पालिकेसंबंधीच्या समस्या मांडत सकारात्मक निर्णय घेत बांधकाम व्यावसायिकांना ताणातून मुक्त करण्याचे साकडे पालिका प्रशासनाला यावेळी घालण्यात आले. आसिफ यांचे बंधू आणि एमसीएचआयच्या पदाधिकारी-सदस्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या प्रलंबित मागण्यांबद्दल पालिका प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करणारे निवेदन दिले. सदर निवेदनात त्यांनी व्यवसायातील तणावामुळे आसिफ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गत आठवड्यात पालिकेने खुल्या जमिनीवरील कराच्या थकबाकीमुळे आसिफ यांच्या काही मालमत्ता जप्त करीत त्यांचा लिलाव केल्याने झालेली बदनामी सहन न होऊन त्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशयही या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या पालिकेसंबंधीच्या समस्या मांडत त्याबाबत सकारात्मक निर्णय घेत बांधकाम व्यावसायिकांना ताणातून मुक्त करण्याचे साकडे पालिका प्रशासनाला त्यांनी घातले.
दोन मालमत्ता लिलावात
आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आसिफ झोजवाला यांचे चुलत भाऊ मोईस म्हणाले की, खुल्या जमिन कराच्या थकबाकीमुळे आसिफ हे गेल्या 15 दिवसांपासून तणावाखाली होते. त्यांना 8 कोटी रुपये भरण्याची नोटीस आली होती. महापालिकेने आसिफ यांच्या दोन मालमत्तांचा लिलावात काढल्या होत्या. त्यामुळे आसिफ तणावात होते. हा कर कमी करण्याबाबत आम्ही पालिकेला वारंवार विनंती करत होतो. यापुढे असा प्रकार होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी. मार्च महिना आला की जीएसटी, खुल्या जमिनीचा कर व अन्य करांचा भरणा करताना बांधकाम व्यावसायिकांना प्रचंड ताण सहन करावा लागतो. ठाण्यातील सुरज परमार, अमर भाटीया यांच्या आत्महत्यांचा संदर्भ देत बांधकाम व्यावसायिकांना प्रचंड ताणतणावाला तोंड द्यावे लागत असल्याचेही एमसीएचआय संघटनेचे उपाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी सांगितले.
झोजवालांची आत्महत्या हा प्रशासनाचा बळी
बांधकाम व्यावसायिकांच्या एमसीएचआय संघटनेच्या कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने शहरातील स्प्रिंग टाईम हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आसिफ झोजवाला यांच्या निधनानिमित्त शोकसभा घेण्यात आली. यावेळी काही बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी श्रद्धांजली वाहताना संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, आसिफ यांनी चुकीचा निर्णय घेतला. त्यांच्या निधनामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासारखी व्यक्ती असा निर्णय घेईल यावर विश्वास बसत नसल्याचे ते म्हणाले. आपल्या व्यवसायातील सर्व सहकार्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे. परस्परांना आधार दिला पाहिजे असेही ते म्हणाले. थकीत कराप्रकरणी आसिफ यांच्या दोन मालमत्तांच्या महापालिकेने लिलाव केला होता. पालिकेने थोडा अवधी द्यावा, अशी आसिफ यांची इच्छा होती असे सांगत तसे त्यांनी सहकार्यांकडे बोलूनही दाखवले होते.