6 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटला
नागरिकांसह पशुधनाला उन्हाळ्यातही झाले पाणी उपलब्ध
नंदुरबार । जिल्हा प्रशासनाचा निर्धार आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व निंभेल गावाची पाणी समस्या दूर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तापीनदीवर सुरू केलेल्या तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणार्या या गावातील नागरिकांना आणि पशुधनाला उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे.
नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व निंभेल या गावात गत तीन ते चार वर्षांपासून ग्रामस्थ भीषण पाणी टंचाईचा सामना करत होते. दोन वर्षांपासून पर्जन्यमान अगदीच कमी झाल्याने भूजलपातळी अगदीच खोल गेली आहे. गावातील सर्वच विहिरी व विंधनविहिरी आटल्या असून परिसरातील सर्वच बंधारे कोरडे पडले आहेत. या गावांना पाण्याचा आधार असलेले बलदाणे धरणही पूर्णतः आटले आहे. परिणामी पाणीटंचाईची भीषणता आणखीनच वाढली होती. या उन्हाळ्यात ग्रामस्थांसमोर गाव सोडण्याचे संकट उभे ठाकले होते.
या भागात दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांचे स्थलांतर आणि पशुधनाचे पालनही मोठी समस्या झाली होती. मात्र, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेत या गावांसाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली.
तापी नदीपासून 12 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकून या गावांना पाणी पुरवठा करण्यात आला. या गावांच्या जवळपास कोणतेच पाण्याचे स्त्रोत नसल्याने, दूरवर असलेल्या तापी नदीच्या पात्रातून पाणी उचल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत स्तरावरील तातडीच्या पाणीटंचाई निवारणासाठी असलेल्या सर्व निधी, स्थानिक विकास कार्यक्रम आणि सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या निधींचा एकत्रित वापर करून योजना राबविण्यात आली.
प्रथम टप्प्यात तापीनदीच्या किनारी विंधनविहीर करून पाण्याची उचल करण्यात आली. सुमारे 9 किलोमीटर जलवाहिन्या टाकून भादवड येथील मोठ्या विहिरीत पाणीसाठा करून गावाची पाणी समस्या दूर करण्यात आली. त्याच विहिरीतून उद्भव घेऊन न्याहली, बलदाणे, व कार्ली या गावांपर्यंत सुमारे 4.5 किलोमीटर जलवाहिन्या टाकून तेथील विहिरीपर्यंत पाणी नेण्यात आले.
जलवाहिन्यांच्या मार्गात रेल्वे रूळ येत असल्याने केंद्रीय रेल्वे प्रशासनानेही पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेता जलवाहिन्या टाकण्याची परवानगी तातडीने दिली. या चारही गावातील एकत्रित 9800 लोकसंख्येसाठी यशस्वीपणे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. सातुर्के येथील 1250 लोकसंख्येला व निंभेल व कंड्रे या गावातील एकत्रित 2640 लोकसंख्येलाही अशाच प्रकारे पाणीपुरवठा करण्यात आला.
शासनाच्या विविध निधींच्या माध्यमातून तातडीने योजना राबविली गेल्याने दुष्काळाने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविण्यात शासनाला यश आले आहे. भर उन्हाळ्यात पिण्याचे पुरेशे पाणी व पशुधनाच्या संगोपनासाठी लागणारे पाणी उपलब्ध झाल्याने गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त करण्यासोबत शासनाचे आभारही मानले आहे
Next Post