मुंबई । तब्बल 124 वर्षे जुन्या तानसा धरणाच्या 38 पूरनियंत्रण दरवाजांचे आणखी मजबुतीकरण करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. धरणाचे दरवाजे, इपॉक्सी गिलावे, रंगकामाचे पिन गंजून खराब झाल्याचे आढळल्याने धरण सुरक्षा संघटनेच्या सूचनेनुसार पालिकेच्या जल अभियंता खात्याने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. मुंबई महापालिका विविध जलस्रोतांतून मुंबापुरीला दररोज 3750 दशलक्ष लहटर्स पाणीपुरवठा करते. तानसा, मोडक सागर, उर्ध्व वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा हे मुख्य जलस्रोत आहेत. तानसा धरण हे पालिकेच्या मालकीचे अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत असून, या धरणातून मुंबई शहराला दैनंदिन 455 दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. हे धरण सन 1982 मध्ये बांधण्यात आले असून, ते 124 वर्षे जुने आहे.
या धरणाचे बांधकाम हे चिरेबंदी दगडी बांधकाम प्रकारातील असून, धरणाची लांबी 2835 मीटर इतकी आहे. या धरणाची मजबुती आणि उंची वाढवण्याची कामे सन 1995, 1927, 1848 व 2005 मध्ये क्रमश: करण्यात आली. हे धरण सुमारे सव्वाशे वर्षे जुने असल्यामुळे धरण सुरक्षा संघटनेच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी निरीक्षण, आवश्यक ती दुरुस्ती, मजबुतीकरण करण्यासंबंधी उपाययोजना व प्रभावी देखभालीविषयी कार्यवाही अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तानसा धरणाच्या बहिर्गामी विहिरीतून व 1800 2750 मि.मी. व्यासाच्या तानसा जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. उंचावर असलेल्या तानसा जलाशयाच्या क्षेत्रात विस्तीर्ण जंगल क्षेत्र असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात लक्षणीय पाऊस पडतो. अन्य जलस्रोतांपेक्षा या जलाशयाचे पाणलोट क्षेत्र ‘खोल’ आणि ‘विस्तीर्ण’ पसरले असल्यामुळे धरण भरून वाहण्यासाठी जास्त अवधी लागतो. मात्र, पूर्ण भरल्यानंतर पाणी जबरदस्त वेगाने बाहेर फेकले जाते.
38 पूरनियंत्रण दरवाजांची दुरुस्ती करणार
तानसा धरणाचा पाण्याचा विसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 38 पूर नियंत्रण दरवाजे बसवण्यात आले आहेत. त्याची लांबी 15.24 मीटर आणि रुंदी 1.22 मीटर इतकी आहे. धरणाच्या पूरनियंत्रण दरवाजे ‘काऊंटर वेट’च्या भागाचे मागील मजबुतीकरण करण्याच्या वेळी ‘इपॉक्सी’ गिलावे, रंगकाम, त्याचे पिन व चॅनल गंजून खराब झालेले आढळले. पूरनियंत्रण दरवाजे सतत पाण्याच्या दबावाखाली येत असल्यामुळे काही भागाचा गिलावा, रंगकाम, त्याचे पिन, चॅनल आदी काही प्रमाणात खराब होते आणि त्यावर कालांतराने दुरुस्ती करणे आवश्यक असते. या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन या धरणाच्या 38 पूर नियंत्रण दरवाजांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी 93 लाख 94 हजार 174 हजार रुपयांचा प्रस्ताव जल अभियंता खात्याने तयार केला असून, बुधवारी होणार्या स्थायी समितीमध्ये तो मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.