तापमानाने गाठली ‘चाळीशी’; उद्योगनगरी दुपारी शांत

0

पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यात उन्हाळाचा चांगलाच तीव्र झाला आहे. यंदा उन्हाळा जास्त जाणवत आहे. तापमानाचा पार्‍याने ‘चाळीशी’ गाठली आहे. त्यामुळे दिवसभर वर्दळीचे असणारे शहरातील रस्ते दुपारी शांत झालेले दिसून येत आहे. कडक उन्हामुळे शहरवासियांच्या दैनंदिन जीवनावर चांगलाच परिणाम झाला आहे. शहराच्या विविध भागातील बाजारपेठा दुपारच्या प्रहरी ओस पडल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लग्नसराईचा मोसम असतानाही बाजारपेठेत गर्दी दिसून येत नाही. अक्षयतृतीयेचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बाजारपेठ मात्र थंडावल्याचे चित्र आहे.

उन्हाच्या तीव्रतेमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस उन्हाळा असह्य होत चालला आहे. एप्रिलमध्येच ही अवस्था तर मेमध्ये काय चित्र असेल, असा विचार नागरिकांमधून ऐकायला मिळतो आहे.

सकाळी आठ वाजताच उन्हाचे चटके जाणवतात. त्यामुळे नागरिक अकरानंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. पाच वाजेपर्यंत ही तीव्रता असते. त्यामुळेच या वेळेत बाजारपेठांमध्ये कुणी फिरकत नाही. पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, भोसरी, दापोडी, आकुर्डी, रावेत, चिखली, किवळे, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडी, निगडी आदी भागात कायम वर्दळीच्या असलेल्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची अघोषित संचारबंदी दिसून येते. खरेदी लवकर आटोपती घेऊन अनेक जण घरचा रस्ता धरतात. सकाळच्या वेळी टपर्‍या, उपहारगृहांभोवती दिसणारी गर्दी देखील लवकर आटोपते घेत असल्याचे पहायला मिळत आहे.

सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. सध्या लग्नसराई असताना उन्हामुळे बाजारपेठ थंडावल्याचा विरोधाभास अनेक वर्षांनंतर यावर्षी एप्रिलमध्ये पहायला मिळत असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. नागरिकांच्या सोयीसाठी बहुसंख्य व्यापार्‍यांनी सकाळी लवकर दुकाने खुली करण्याचा आणि रात्री उशिराने बंद करण्याचा तोडगा काढला आहे. त्यामुळे शहराचे दैनंदिन जीवनमान सकाळी लवकर सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालत राहत असल्याचे सध्या चित्र आहे. साडेतीन मुहुर्तार्ंपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुकींगसाठी गर्दी असते. मात्र यावषर्भ त्या बाजारातही शांतता दिसून येत आहे.

* उन्हामुळे दुचाकीस्वारांच्या त्रासात वाढ
नागरिकांना सकाळी कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडावे लागते. तसेच दैनंदिन काम करणार्‍या कामगारांना मात्र या तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो आहे. दुपारच्या वेळी काम करणार्‍या कामगारांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. उष्णतेमुळे हवा प्रसरण पावते. उष्णतेमुळे गाडीची ट्यूब फुटण्याचे प्रकारही वाढत आहेत. एकीकडे कामाची घाई तर दुसरीकडे उन्हाचे चटके ही मोठी तारेवरची कसरत दुचाकीस्वारांना करावी लागत आहे. अनेक पुरुष व महिला या उन्हाच्या चटक्यापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा, तोंडावर रुमाल (ओढणी) व हातात हातमोजे वापरतात. कामाची घाई असल्यामुळे दुचाकीस्वारांना आपले वाहन भरधाव वेगाने दामटावे लागते. त्याचबरोबर उष्ण झळाही सहन कराव्या लागतात. वाहनांच्या वेगाबरोबर हवा मिळते ती मात्र उष्ण हवा मिळते. गरम भट्टीत असल्याचा अनुभव वाहनचालकांना येत आहे.