नंदुरबार । जिल्ह्यातील शेतकरी बांधव सध्या बागायती कापसाची लागवड करण्यासाठी शेत तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. मे महिन्याचा पहिल्या व दुस-या आठवड्यात तापमान 44.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचले होते. तापमान कमी झाल्यानंतर कापसाची लागवड करण्याचे आवाहन पी. सी. कुंदे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यांनी केले आहे. यासाठी बागायती कापसाची लागवड 20 मे नंतर करणे अधिक फायदेशीर राहणार आहे. बागायती कापसाच्या लागवडीसाठी शेवटच्या वखरणी पाळी अगोदर 20 बैलगाड्या शेणखत किंवा कम्पोष्ट खत जमिनीत मिसळावे. लागवडीसाठी सरी वरंभा किवा ठिबक सिंचनाची सोय असल्यास उंच वरंभा वापरावा. लागवडी अगोदर सरी किवा वरंभा चांगला ओला करून मग कापसाची लागवड करावी.
किडीला प्रतिकारक वाणांची निवड करा
शेतात तणांचा जास्त प्रादुर्भाव होत असल्यास पेरणीपूर्वी 1 कि. सक्रीय घटक बासालीन किवा पेंडामिथीलीन प्रती हेक्टरी ओलावा असताना फवारावे. जमिनीच्या मगदूरा प्रमाणे 2 ओळीत आणि 2 झाडात अंतर ठेवावे. वाण निवडताना आपला पूर्वीचा अनुभव आणि रोग किडीला प्रतिकारक असलेल्या वाणांची निवड करणे आवश्यक आहे. लागवडीच्या वेळी कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी सापळा पिके आणि आंतरपिकांचा वापर करावा. यासाठी कापसाच्या सभोवताली एक ओळ मका,चवळी तर बांधावर ठराविक अंतराने एरंडी आणि झेंडू यांची काही झाडे लावावी. कोरडवाहू कापूस मात्र मान्सूनचा सुमारे 75-100 मिमी पाऊस झाल्यानंतर लागवड करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे