तापत्या उन्हापासून दूर राहावे आणि लहान मुलांना तर उन्हात अजिबात फिरकूच देऊ नये, अशी नकारात्मक जीवनशैली रुजू लागली आहे. सूर्याला आपल्या आयुष्यातून असे हद्दपार करणे आणि उन्हात जायची वेळ आलीच तर डोक्यावर टोपी, त्यावर स्कार्फ, डोळ्याला गॉगल, असा जामानिमा करूनच बाहेर पडणे कधी कधी तोट्याचेही ठरते. वनस्पती अन्नाबाबतीत स्वावलंबी असतात. त्या त्यांचे अन्न तयार करू शकतात. त्यांच्या देहात हरितद्रव्य असते. या हरितद्रव्याच्या आधाराने, पाणी आणि कार्बन डायॉक्साइडवायू हे मूळ घटक वापरून सूर्याच्या उपस्थितीत वनस्पतींना कर्बोदके बनवता येतात. वनस्पतींनी बनवलेले हे अन्न खाऊन इतर प्राणी जगतात. आपण माणसेही तसेच करतो. अन्नाप्रमाणेच जीवनाला अतिशय अल्प प्रमाणात लागणारी जीवनसत्त्वेही आपण वनस्पतींकडूनच मिळवतो. जीवनसत्त्वे शरीराला आवश्यक असतील तर ती शरीर स्वत:च का निर्माण करत नाही? ती इतरांच्या जीवावर का अवलंबून ठेवली आहेत? एका जीवाने दुसर्या जीवाला पुष्ट करावे असे निसर्गाला वाटते? अर्थात निसर्गाने सर्वच जीवांना परावलंबी केलेले नाही आणि सर्वच बाबतीत परावलंबी केलेले नाही.
केवळ दोन जीवनसत्त्वे अशी आहेत ज्यांच्याबाबतीत माणूस स्वावलंबी आहे. जीवनसत्त्व ‘ब’ मधील काही प्रकार आणि जीवनसत्त्व ‘ड’ आपल्या शरीरात तयार होतात. त्यापैकी जीवनसत्त्व ब मधील काही प्रकार आपल्या पचनसंस्थेत सुखाने राहणारे आपले मित्र जीवाणू तयार करतात. मात्र जीवनसत्त्व ‘ड’ आपले आपणच तयार करतो. जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी – कोलेस्टेरॉल – कच्चा माल म्हणून लागते. कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक हार्मोन्स बनतात. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पित्तरस. यकृतात कोलेस्टेरॉलचा वापर करून पित्तरस बनतो. हा पिवळसर हिरवा रंग असणारा पित्तरस लहान आतड्यात अन्न पचवण्याचे काम करतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल बनलेच नाही तर आपल्याला अनेक शारीरिक क्रिया करताच येणार नाहीत. कोलेस्टेरॉल आपला शत्रू नाही तर जन्माचा जोडीदार आहे. हे कोलेस्टेरॉल सूर्यप्रकाशाच्या मदतीने त्वचेच्या वरच्या स्तरात ‘ड’ जीवनसत्त्व तयार करते, उन्हात जायचे ते त्यासाठीच! सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यात विविध प्रकारच्या प्रकाश लहरी असतात. त्यांपैकी अतिनील – ब किंवा अल्ट्राव्हायोलेट- बी (290 ते 320 नॅनोमीटर ) प्रकारच्या तरंगलहरी ड जीवनसत्त्व बनण्यासाठी उपयुक्त असतात.
सूर्य उगवताना तांबूस दिसतो. कारण सूर्य आणि आपल्यामध्ये हवेचा थर जाड असतो. त्यातून येताना बाकीचे तरंग इतस्तत: फेकले जातात आणि तांबड्या रंगाच्या लहरीच आपल्यापर्यंत पोहोचतात. सूर्य वर चढेल तसतसा सूर्य किरणांना पार करायला लागणारा हवेचा थर कमी कमी होत जातो. अधिक तरंगलांबीच्या लहरी आपल्यापर्यंत पोचतात. मग सूर्याचा प्रकाश पांढुरका आणि प्रखर दिसायला लागतो. अशा प्रकाशात अतिनील ‘ब’ किंवा अल्ट्रा व्हॉयोलेट बी प्रकारच्या तरंगलहरी असतात. त्या ‘ड’जीवनसत्त्व तयार करण्यासाठी आवश्यक असतात. कोलेस्टेरॉलपासून ‘ड’ जीवनसत्त्व बनते ते आपल्या त्वचेच्या वरच्या स्तरात. जितकी त्वचा सूर्यप्रकाशाला उघडी असेल तितक्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार होतात. हे काम अगदी कोवळ्या उन्हात होऊ शकत नाही. सूर्य साधारण क्षितिजापासून पंचेचाळीस अंशवर आला की, हे काम सुरू होते. सकाळच्या म्हणजे कोवळ्या नव्हे; पण चटका बसणार्याही नव्हे अशा उन्हातच आपले शरीर ‘ड’ जीवनसत्त्व बनवू शकते. (25 ते 30 मिलीग्रॅम प्रती चौरस सेंटिमीटर). आधुनिक जीवनशैलीत उन्हा-तान्हातले कष्ट आणि सूर्य यांना हद्दपार करण्याला ‘विकसित’झाल्याचं मानलं जातं. ती कल्पना हद्दपार व्हायला पाहिजे. उन्हामुळे त्वचा काळवंडते म्हणून घराबाहेर पडल्यावर अनेक मुली-स्त्रिया विशेषत: वाहन चालवताना चेहरा झाकून घेतात, हातपायही झाकून घेतात. त्यांच्यात ‘ड’जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊ शकतो. त्वचा उजळ करण्याचे दावे करणारी क्रीम्स शिवाय ‘सनस्क्रीन’ लावतात. त्यातील रसायने त्वचेच्या आत ऊन जाऊ देत नाहीत.
कितीही ‘माइल्ड’ क्रीम असले तरी ते अतिनील ‘ब’ किरणांना त्वचेच्या आतल्या भागापर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळेच ‘ड’ जीवनसत्त्व तयार होण्यास मज्जाव होतो. आपल्या शरीरात एक मिलिलिटर रक्तात 50 ते 70 नॅनोग्राम इतक्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व असावंच लागतं. इतकंसं ‘ड’ जीवनसत्त्व आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या 3000 जनुकांना कार्यरत ठेवते. ही जनुके कार्यरत राहिली नाहीत, तर शरीरात अनेक व्याधी आणि आजार निर्माण होऊ शकतात. ड जीवनसत्त्वाचा अभाव ओळखण्याची सर्वात सोपी परीक्षा म्हणजे छातीचे हाड अंगठ्याने दाबा. दाबल्यावर कळ आली किंवा दुखले तर ड जीवनसत्त्वाचा अभाव असू शकतो. ऑस्टिओपोरोसीस म्हणजे हाडांमध्ये पोकळ्या वाढतात. पुढे मन दडपलेले असणे, मधुमेह, लठ्ठपणा, सोरायसिस, दुभंगलेली मनोवस्था, स्तनाचा, गर्भाशयाचा, प्रोस्टेटचा कर्करोग अशा अनेक विकारांची पायाभरणी होऊ शकते. सकाळच्या उन्हात फिरण्याला आपण सूर्यस्नान म्हणू. सूर्यस्नानात तयार झालेले ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणूनंतर शरीरात यकृत या अवयवात जातात. तिथे त्यांचे रेणू थोडे पक्के होतात. त्यानंतर ते मूत्रपिंडाकडे नेले जातात. तिथे त्यांचे पक्के ‘ड’जीवनसत्त्व होते. त्यालाच डॉक्टरी भाषेत ‘कोलेकॅल्सिफेरॉल’ म्हणतात. या प्रक्रियेला अठ्ठेचाळीस तास लागतात. ‘ड’ जीवनसत्त्व मूत्रपिंडात तयार झाले की, त्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य सुरू होते ते म्हणजे शरीरातून लघवीवाटे बाहेर पडणार्या कॅल्शिअमला पकडून परत शरीरात कार्यरत करणे. आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली, तर शरीर हाडातून-दातातून हाडे पोखरून कॅल्शिअम काढून घेते. पोखरलेली हाडे ठिसूळ बनतात, अशी हाडे मोडण्याची शक्यता वाढते. इतके करून घेण्यापेक्षा जाऊ या की थोडे उन्हात फिरायला. बसू द्याकी बसले तर थोडे चटके…
तापत्या उन्हाचे फायदेही
सध्या उन्हाचा पारा चढलाय. मुंबई, रायगड, नंदुरबार असो की नागपूर असो सगळीकडे अंगाची लाहीलाही सुरू आहे. अशा उन्हात डिहायड्रेशनच्या भीतीने आपण मुलांना बाहेर पडूच देत नाही. पण याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. उन्हात फिरणे जसे धोकादायक तसे आरोग्याला जीवनदायीही आहे. उन्हात न फिरण्याचे तोटे म्हणजे तुमच्या मुलांचे मोठेपणी दात लवकर पडतात आणि हाडेही ठिसूळ होतात, हे नक्की. म्हणून अगदीच आपल्या निसर्गाच्या चक्राला नकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करू नका.
– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117