तापी काठावरील 30 हेक्टर केळी पाण्याअभावी मातीमोल

0

केळी उत्पादकांवर जलसंकट ; विहिरींसह बोअरवेल आटल्या ; 800 फुटानंतरही पाणी लागेना

रावेर- तालुक्यातील खिरवड येथील शेत-शिवार परीसरात पाण्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. या परीसरातील गत पंधरा दिवसात शेतकर्‍यांच्या तब्बल 30 ट्युबवेलचे पाणी आटले असून पाण्याअभावी सुमारे 30 हेक्टरवरील केळी खोड सोडावी लागल्याने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या परीसरात रणरणत्या उन्हामुळे विहिरींसह बोअरवेेल आटल्या असून तब्बल 800 फुटानंतरही पाणी लागत नसल्याने शेतकर्‍यांमधून चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यातील खिरवड गावात पाण्यासाठी मोठी भटकंती ग्रामस्थांना करावी लागत आहे.

तालुक्यात पाणीप्रश्‍न बिकट
तालुक्यातील मोरगाव, खिरवड, बोहर्डे परीसरात शेत-शिवारात पाण्याची भयानक समस्या निर्माण झाली असून या पैकी एकट्या खिरवड शिवारातील सुमारे 30 ट्युबलेलचे पाणी आटले आहे. या गावाजवळील तापी नदीसुद्धा कोरडीठाक पडली आहे. 1972 सालापेक्षा जास्त पाणीटंचाई यावर्षी जाणवत असून इतिहासातही याआधी जलसंकट कधी पाहिले नसल्याचे खिरवड येथील वृद्ध नागरीक सांगतात.

तापी काठच्या खिरवड गावात पाणीबाणी
तापी नदी काठी असलेल्या पाच हजार लोकसंख्याच्या खिरवड गावावर सुद्धा पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पुढील 25 दिवसात पाऊस नाही आला तर या गावकर्‍यांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. आधीच केळी पीक या गावातील शेतकर्‍यांनी सोडले आहे, असे येथील सरपंच नीलकंठ चौधरी यांनी सांगितले.

15 दिवसात 30 ट्युबवेल कोरड्याठाक
मागील पंधरा दिवसात या भागातील शेत-शिवारात असलेल्या ट्युबवेलचे अचानकपणे जलस्त्रोत कमी झाले व किमान 30 ट्युबवेली कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकर्‍यांनी केळी वाचवण्यासाठी ट्युबवेलींचे खोलीकरण ही केली मात्र 800 फूटांवरही पाणी लागत नसल्याचे चित्र आहे. जवळच तापी नदी असलीतरी तिचे पात्रही कोरडेठाक आहे. दरम्यान, शेती शिवारात पाणी नसल्याने या भागातील शेतकर्‍यांनी सुमारे 30 हेक्टर केळी सोडून दिली आहे. यामुळे शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.